corona virus : रुग्णाच्या निवासाच्या ३ कि. मी. परिघात युद्धपातळीवर सर्वेक्षण; संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:11 PM2020-03-16T12:11:14+5:302020-03-16T12:17:38+5:30

४८ तासांत संशयित रुग्ण ओळखून संसर्ग रोखण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान

corona virus: warfare surveys in 3 kms from the patient's residence ; The search for the contact person started | corona virus : रुग्णाच्या निवासाच्या ३ कि. मी. परिघात युद्धपातळीवर सर्वेक्षण; संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु

corona virus : रुग्णाच्या निवासाच्या ३ कि. मी. परिघात युद्धपातळीवर सर्वेक्षण; संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु

googlenewsNext
ठळक मुद्दे मनपाच्या १८ कर्मचाऱ्यांची ९ पथके;आरोग्य पथकाची घरोघरी भेट शहरात परतल्यानंतर घेतला वर्गपती, मुलांची, शेजारच्यांची तपासणी

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह म्हणून निदान होताच रविवारी दुपारनंतर सदर रुग्णाच्या निवासस्थानाच्या ३ कि.मी.च्या परिसरात महापालिकेने युद्धपातळीवर सर्वेक्षणाचे काम सुरू केले. प्रारंभी रुग्णाच्या अगदी जवळ संपर्कात आलेल्या व्यक्तींचे (हायरिस्क क्लोज कॉन्टॅक्ट) सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक घरी जाऊन लोकांच्या प्रकृतीची विचारणा केली जाणार आहे. एखादा संशयित आढळल्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाणार आहे, अशी माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

महापालिकेने सर्वेक्षणासाठी ९ पथके तयार केली आहेत. एका पथकात दोघांचा समावेश आहे. यामध्ये परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रविवारी दुपारनंतर हे सर्वेक्षण तात्काळ सुरू करण्यात आले. यामध्ये प्रारंभी या महिलेच्या घराशेजारील आणि अगदी जवळून संपर्क झालेल्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतर घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. यामध्ये घरातील प्रत्येक सदस्याला काही त्रास आहे का, संबंधित रुग्णाच्या संपर्कात कोणी आले होते का, जर संपर्क झाला असेल, तर त्यानंतर ते कोठे गेले होते, याची माहिती गोळा करण्यात येत आहे. आगामी ४८ तासांत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही चिंता करू नये. खबरदारी घेण्याचे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले.

टूर्स, ट्रॅव्हल्समधील लोक शोधणार
सदर महिला टूर्स, ट्रॅव्हल्सद्वारे रशिया, कझाकिस्तानच्या प्रवासाला गेल्या होत्या. त्यातील प्रत्येक लोकांचा शोध घेतला जाणार आहे. संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.

शहरात परतल्यानंतर घेतला वर्ग
शहरात परतल्यानंतर प्राध्यापक महिलेने त्यांच्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांचा वर्ग घेतल्याचीही माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासंदर्भातही निर्णय घेतला जाणार आहे. प्राध्यापिकेला कोरोना झाल्याची माहिती संस्थेतील काही अन्य प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांपर्यंत गेली. त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले. परंतु कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले.

६ तास दिल्ली विमानतळावर, फक्त ताप तपासला
परदेशातून परतल्यानंतर दिल्ली विमानतळावर सदर रुग्णाचा थर्मल स्कॅनिंगद्वारे केवळ ताप तपासण्यात आला. तेव्हा काहीही आढळून आले नाही. त्यानंतर सदर रुग्ण दिल्ली विमानतळावर ६ तास होत्या. त्यानंतर दिल्ली-औरंगाबाद प्रवासही विमानाने केला. त्यामुळे अन्य विमान प्रवाशांचा शोध घेऊन तपासणी करण्याची वेळ ओढावण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी वर्तविली.ज्या दिवशी रशियात पहिला रुग्ण आढळला त्याच दिवशी त्या औरंगाबादेत खाजगी रुग्णालयात दाखल झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पती, मुलांची, शेजारच्यांची तपासणी
महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर महिलेचा पती, मुलांमध्ये काही लक्षणे आहेत का, याची तपासणी केली. तेव्हा त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. महिलेच्या जवळच्या अन्य नातेवाईकांसह संपर्कात आलेल्या इतरांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यासोबत प्रवासात त्यांच्या घराशेजारील २ जण होते. त्यांचीही तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  संपर्कात आलेल्या नातेवाईकांना १४ दिवस घरीच राहण्याचा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मुलगा डॉक्टर: ‘कोरोना’ मुक्त करण्यासाठी योगदान
सदर महिलेचा एक मुलगा डॉक्टर आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून योगदान दिले जात असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांना वसतिगृहात थांबवले 

दरम्यान, प्राध्यापिका ज्या संस्थेत शिकवत होत्या येथील सर्वाची तपासणी करण्यात येत आहे. संस्थेत प्रवेश करणाऱ्यास रुमाल लावण्याची सूचना दिली जात आहे. विद्यार्थ्यांना गावी जाण्याचे थांबविण्यात आले आहे. त्यासाठी त्यांचे तिकीतही रद्द करण्यात आले आहेत. वस्तीगृहातच १४ दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

Web Title: corona virus: warfare surveys in 3 kms from the patient's residence ; The search for the contact person started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.