corona virus : तज्ज्ञांचे मत : तापमान वाढले तर कोरोनाचा प्रभाव घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 06:50 PM2020-03-11T18:50:59+5:302020-03-11T18:54:21+5:30

नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांची खबरदारी घेणे गरजेचे

Corona virus: Expert opinion: Corona effect will decrease if temperature rises | corona virus : तज्ज्ञांचे मत : तापमान वाढले तर कोरोनाचा प्रभाव घटेल

corona virus : तज्ज्ञांचे मत : तापमान वाढले तर कोरोनाचा प्रभाव घटेल

googlenewsNext

औरंगाबाद : जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू २८ ते ३० डिग्रीपर्यंतच्या तापमानातच जिवंत राहू शकतो. हा विषाणू कपड्यांवर ९ तास, तर लोखंडी पृष्ठभागावर १२ तास जगू शकतो. औरंगाबादेत उन्हाळ्यात एप्रिलमध्ये तापामानाचा पारा ४३ अंशांवर जातो. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेने कोरोनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

शहरात वातावरणातील नागरिकांना ताप, सर्दी, खोकल्यासह नाक बंद होणे, डोकेदुखी, ऐकू न येणे, तसेच घसादुखीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे. शहरात गतवर्षी एप्रिलमध्ये ६१ वर्षांनंतर उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती.  कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात कोरोनाची भीती दूर होईल. आगामी काही दिवस ढगाळ वातावरण राहील. मात्र, उच्च तापमान, कोरडे वातावरण या विषाणूसाठी मारक ठरेल, असे तज्जांचे मत आहे.


तापमानाचा परिणाम होईल
कोरोनासंदर्भात आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. तापमान वाढल्यानंतर या विषाणूचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे; परंतु एकमेकांपासून तो पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेतली पाहिजे.
- डॉ. जी. एम. गायकवाड, सहायक संचालक, आरोग्यसेवा

एप्रिलमध्ये गायब
सामाजिक बांधिलकी म्हणून विमानतळावर आमच्याकडून प्रवाशांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी आम्ही डॉक्टर, तर मनपाने यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. ताप अधिक असलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे; परंतु हा विषाणू एप्रिलमध्ये गायब होईल. त्यामुळे चिंतेचे कारण नाही.    
- डॉ. उन्मेष टाकळकर


प्रमाण कमी राहील
कोरोनाचा विषाणू कपड्यावर ९ तास जिवंत राहू शकत असल्याचे सांगितले जाते. उन्हाळ्यात कोरोनाचे प्रमाण कमी होईल, अशीच शक्यता आहे. प्रतिबंधात्मक काळजी घेणे केव्हाही चांगले. स्वच्छतेवर अधिक भर द्यावा.
- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन, घाटी

३८ वर जाणार तापमान
औरंगाबादचे तापमान मार्चअखेरपर्यंत ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.  दुपारी  तापमान अधिक असेल. पावसाळा दीड महिना लांबल्याने हिवाळाही लांबला आहे. त्यामुळे सकाळी  व सायंकाळी थंडी  काही दिवस राहील. गेल्या दोन दिवसांपासून धुकेही आहे.
- किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ

Web Title: Corona virus: Expert opinion: Corona effect will decrease if temperature rises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.