Corona vaccination below 50 percent in Aurangabad District; Decreased graph of patients, effect of reaction on vaccination | कोरोना लसीकरण ५० टक्क्यांखालीच; रुग्णांचा घसरलेला आलेख, रिॲक्शनचा लसीकरणावर परिणाम

कोरोना लसीकरण ५० टक्क्यांखालीच; रुग्णांचा घसरलेला आलेख, रिॲक्शनचा लसीकरणावर परिणाम

ठळक मुद्देदिवसभरात ९८४ आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ४४३ म्हणजे ४५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली टप्प्याटप्प्यात लसीकरणाचे प्रमाण वाढेल, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे म्हणाले.

औरंगाबाद : जिल्ह्यात लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी लसीकरणात १० टक्क्यांनी वाढ झाली; परंतु तरीही जिल्ह्यातील लसीकरण ५० टक्क्यांखालीच राहिले. दिवसभरात ९८४ आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ४४३ म्हणजे ४५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली; परंतु तब्बल ५५ टक्के कोरोना योद्ध्यांनी लस घेण्याचे टाळले. कोरोनाची गेल्या काही दिवसांत घटलेली रुग्णसंख्या, मृत्यूचे कमी झालेले प्रमाण आणि रिॲक्शनची धास्ती या सगळ्यांचा लसीकरणावर परिणाम होत आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४ आणि शहरात घाटी तसेच मनपाअंतर्गत ५ खाजगी रुग्णालयांत लसीकरण झाले. ग्रामीण भागात मंगळवारी ४०० पैकी केवळ ४९ जणांनी लस घेतली होती. त्यातुलनेत बुधवारी ४०० पैकी १२६ जणांनी लस घेतली. ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र बदलण्याची मागणी होत आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वैजापूर, सिल्लोड, पाचाेड, अजिंठा येथे लसीकरण केंद्र आहे; पण याठिकाणच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण जवळपास पूर्ण झालेले आहे. तरीही ही केंद्रे कायम ठेवण्यात आली आहेत. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह अन्य तालुक्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, मंगळवारच्या तुलनेत लसीकरणात वाढ झाली. ॲपमध्ये अद्यापही काही प्रमाणात अडचण येत आहे.

शहरात ५४ टक्के लसीकरण
शहरातील घाटीसह पाच खाजगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांत बुधवारी ५८४ पैकी ३१७ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले. लसीकरणाचे प्रमाण ५४.२८ टक्के राहिले. घाटीतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही लसीकरणाकडे पाठ दाखविली. १०० पैकी केवळ १६ जणांनी लस घेतली.

९ जणांना रिॲक्शन
डाॅ. हेडगेवार रुग्णालयात ५ जणांना लसीकरणानंतर मायनर रिॲक्शन आली, तर सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल, कमलनयन बजाज हॉस्पिटल येथे प्रत्येकी एक आणि मेडिकव्हर हॉस्पिटल येथे दोघांना मायनर रिॲक्शन आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर यांनी दिली.

लसीकरणाचे प्रमाण वाढणार
लसीकरण हे अनेक महिने चालणार आहे. त्यामुळे सध्या प्रमाण जरी कमी असले तरी आगामी दिवसांत त्याचे प्रमाण वाढेल. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यासारखे वाटत आहे. त्याचा काहीसा परिणाम होत आहे; पण टप्प्याटप्प्यात लसीकरणाचे प्रमाण वाढेल, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे म्हणाले.

Web Title: Corona vaccination below 50 percent in Aurangabad District; Decreased graph of patients, effect of reaction on vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.