Corona patients get oxygen from a ‘Made in China’ machine | कोरोना रुग्णांना ऑक्सिजन ‘मेड इन चायना’ मशीनमधून

कोरोना रुग्णांना ऑक्सिजन ‘मेड इन चायना’ मशीनमधून

ठळक मुद्दे नवीन प्लँटसाठी लागणारी यंत्रे चीनमधून मागवावी लागणारमराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, जालन्यात ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग चीनमधून झाल्याचा आक्षेप आहे. असे असले तरी कोरोनाबाधित रुग्णाला लागणारे ऑक्सिजन ‘मेड इन चायना’ यंत्रातूनच उत्पादित करावे लागणार आहे. विभागातील प्रस्तावित प्लँटसाठी लागणारी मशिनरी चीनमधून येण्यास सुमारे तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

चीनमधून यंत्रे येण्यासाठी उशीर झाल्यास प्लँटमधून उत्पादनाला उशीर होईल. विभागात एक प्लँट जरी उभा राहिला तरी चाकण, रायगड येथील उत्पादकांवर अवलंबून राहण्याची वेळ विभागावर येणार नाही. मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, जालन्यात ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार असून त्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि कंत्राटदारांच्या मागे लागून विभागीय प्रशासनाला काम करून घ्यावे लागते आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विभागाने आत्मनिर्भर होण्याचा विचार सुरू केला. त्यात जालन्यात दोन प्लँट उभारण्यासह औरंगाबादेत मेल्ट्रॉन आणि सिव्हिल हॉस्पिटलचा विचार करण्यात आला. परभणीतही दोन प्लँट उभारण्याबाबत निर्णय झाला आहे.

विभागीय प्रशासनाने मागविली माहिती
औरंगाबाद सिव्हील हॉस्पिटल, मेल्ट्रॉन कोविड हॉस्पिटल, जि. प.परभणी, परभणी आयटीआय येथील ऑक्सिजन प्लँटचे काम कुठंपर्यंत आले आहे. मेल्ट्रॉनचे काय झाले आहे. तांत्रिक अडचण असल्यास नेमकी अडचण कुठे आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवावी. ३० टक्के ऑक्सिजन टँकमध्ये राहिल्यानंतर अलार्म बसविण्याची सिस्टीम बसविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संबंधित उपायुक्तांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१०० ते २०० मेट्रीक टनाचे उत्पादन
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना आणि परभणी येथे लिक्विड ऑक्सिजन उत्पादनाचे प्रकल्प सुरू करण्याबाबतच्या निर्णयाला सहा महिने झाले. १०० ते २०० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनची निर्मिती त्या प्रकल्पांतून करण्याचा मानस आहे. पुणे, रायगड, नागपूरनंतर मोठे ऑक्सिजन प्रकल्प मराठवाडयात होण्याची योजना असून ‘महावितरण’ची जोडणी, एफडीए, स्फोटक परवानगी याबाबत प्रशासन वेगाने प्रक्रिया पूर्ण करण्यात गुंतले आहे.

Web Title: Corona patients get oxygen from a ‘Made in China’ machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.