करडी तेलाच्या भावातील तफावतीने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 07:05 PM2019-09-16T19:05:31+5:302019-09-16T19:09:01+5:30

मोंढ्यात १२० रुपये, तर अन्य भागांत १८० रुपये प्रतिलिटरने विक्री

Confusion in prices of karadi cooking oil among consumers | करडी तेलाच्या भावातील तफावतीने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण 

करडी तेलाच्या भावातील तफावतीने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण 

googlenewsNext
ठळक मुद्देतेलात भेसळ होत असल्याची शंकाअन्न, औषध प्रशासनाचे होतेय भेसळीकडे दुर्लक्ष तेल उत्पादकांनी कर्नाटक व आंध्र प्रदेशातून करडी मागविणे सुरू

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : मागील वर्षी दुष्काळामुळे करडीचे उत्पादन घटल्याने करडी तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. असे असले तरी मोंढ्यात १२० रुपये, कुठे १४० रुपये, तर शहराच्या अन्य भागांतील दुकानांमध्ये १७५ ते १८० रुपये प्रतिलिटरने करडी तेल विकले जात आहे. भावातील या मोठ्या तफावतीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तेलाच्या भावातील हे गौडबंगाल काय आहे. आपण करडी तेल खरेदी करतो ते असली आहे की भेसळीचे, अशी शंका आता ग्राहकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. 

औरंगाबादमध्ये करडी तेलाची आवक जालना, अकोला, सोलापूर, लातूर या भागांतून होत असते. दरवर्षी वसंतपंचमीला फेबु्रवारी महिन्यात नवीन आवक सुरू होते. मात्र, २०१८ मध्ये कमी पावसाचा फटका करडीच्या उत्पादनाला बसला व यंदा तब्बल साडेतीन महिने उशिराने नवीन करडी तेल शहरात दाखल झाले. सुरुवातीला १६० रुपये लिटरने विक्री होणारे करडी तेल सध्या १७५ ते १८० रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे, तर पॅकिंगमधील तेल खरेदीसाठी १९० रुपये मोजावे लागत आहे.

महाराष्ट्रात करडी उत्पादन घटल्याने जालन्यातील करडी तेल उत्पादकांनी कर्नाटक व आंध्र प्रदेशातून करडी मागविणे सुरू केले, तर काही व्यापारी थेट सोलापूरमधूनच करडी तेल मागवीत आहेत. यापूर्वी १३० रुपये लिटरपर्यंत करडी तेल विक्री झाले आहे. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच १८० रुपये लिटरपर्यंत या तेलाचे भाव जाऊन पोहोचले आहेत. हा आजपर्यंतच्या भावातील उच्चांकच होय. करडी तेलाचे भाव वाढले असले तरीही शहरात मात्र १२० रुपये, १४० तर ते १८० रुपयांदरम्यान सुटे तेल विकले जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लिटरमागे ३ ते ५ रुपयांपर्यंतचा फरक ठीक आहे; पण लिटरमागे एकदम ४० ते ६० रुपयांचा फरक निर्माण झाल्याने ग्राहकवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. या भावातील तफावतीमुळे ग्राहक व खाद्यतेल विक्रेत्यांमध्ये दररोज वादावादी होत आहे. व्यापारी आपापल्या परीने आपले करडी तेल किती शुद्ध आहे, हे ग्राहकांना समजावून सांगत आहेत, तर काही व्यापारी ग्राहकांची लूट करीत असल्याचेही कमी किमतीत तेल विक्री करणारे व्यापारी सांगत आहेत. यामुळे ग्राहकांच्या मनाचा गोंधळ उडाला आहे. 

खाद्यविक्रेते किमतीबद्दल दावे, प्रतिदावे करीत असले तरी करडी तेलाच्या किमतीत काही तरी गौडबंगाल आहे, असे ग्राहक बोलून दाखवीत आहेत. कारण, घाऊकमध्ये शनिवारी करडी तेलाचे भाव १८३ रुपयांपर्यंत गेले आहेत. शहरातील व्यापाऱ्यांकडे ५ ते १० दिवसांपूर्वी खरेदी केलेले खाद्यतेल असल्याने सध्या किमती त्याच आहेत. नवीन भावानुसार खाद्यतेल पुढील १५ दिवसांत लिटरमागे आणखी ५ रुपयांनी वाढून १८० ते १८५ रुपये लिटरपर्यंत भाव जाऊन पोहोचतील, असे खाद्यतेल विक्रेत्यांनी सांगितले. यात लिटरमागे आम्ही २ ते ३ रुपये नफा कमावतो, असेही या व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. काही जण १२० रुपये लिटर या भावात कसे खाद्यतेल विकत आहेत. 


सोलापूरहून येते भेसळयुक्त करडी तेल 
आम्ही करडी तेलाचे उत्पादक आहोत. आंध्र प्रदेश व कर्नाटकातून करडी आणून त्याचे तेल जालन्यात काढले जाते. शनिवारी होलसेल विक्रीत १८२ रुपये किलोने विक्री झाले. जालन्यातून औरंगाबादेत करडी तेल विक्रीला येते. येथे ५ ते १० दिवसांपूर्वीचा स्टॉक असल्याने १७५ ते १८० रुपयांपर्यंत लिटरने करडी तेल विकले जाते, तसेच सोलापूर जिल्ह्यातूनही करडी तेल औरंगाबादेत विक्रीला येत असून, त्यात कमी किमतीच्या सोयाबीन, सरकी तेलाची भेसळ केलेली असते. यामुळे भेसळयुक्त करडी तेल १२०, १४० रुपयांना विकले जात आहे.  
- कृणाल कोरडे, करडी तेल उत्पादक, जालना 
 

Web Title: Confusion in prices of karadi cooking oil among consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.