Like the army, the health department should cancel the exam and take a new one | लष्कराप्रमाणे आरोग्य विभागाने परीक्षा रद्द करून नव्याने घ्यावी

लष्कराप्रमाणे आरोग्य विभागाने परीक्षा रद्द करून नव्याने घ्यावी

ठळक मुद्देरॅकेटमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची सहभागाच्या दृष्टीने चौकशी

औरंगाबाद : लष्करी जवानांच्या भरतीसाठी देशव्यापी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने रविवारी ही परीक्षाच रद्द करण्यात आली. आरोग्य विभागाने रविवारी घेतलेली परीक्षा रद्द करून नव्याने घेण्याची मागणी जोर धरत आहे.

खोकडपुरा येथील अभ्यासिकेत आरोग्य विभागाच्या परीक्षेत उत्तरे पुरविणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांना या ठिकाणाहून काही आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांसह नावे असलेली कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे या रॅकेटमध्ये आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी अभ्यासिकेवर छापा टाकून प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. त्याबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे असलेली कागदपत्रे आढळली आहेत. त्यामुळे पोलिसांबरोबर आरोग्य विभागही चौकशी करीत आहे. या प्रकरणात आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे की नाही, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.

पेपर फुटला, परीक्षा परत घ्यावी
खाजगी वाहनांतून आरोग्य विभागाच्या पेपरची वाहतूक झाली. त्यावर कोणाचीही देखरेख नव्हती. शिवाय पोलिसांनी रॅकेट पकडले आहे. त्यांच्याकडेही प्रश्नपत्रिका आढळल्या आहेत. त्यामुळे झालेली परीक्षा रद्द करावी आणि परत घेतली पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (पूर्व) प्रभाकर बकले म्हणाले.

केंद्रात जाण्यापूर्वी पकडले
परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करून संबंधित व्यक्तींना पकडले आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पोलीस चौकशी करीत आहेत. त्यांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त होईल. त्यातून काही समोर येईल.
-डाॅ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक

Web Title: Like the army, the health department should cancel the exam and take a new one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.