'पाचोळा'ची पन्नाशी: एका बाईशी एकरूप होऊन मी कादंबरी कशी लिहिली याचे मलाच आश्चर्य: रा.रं. बोराडे

By शांतीलाल गायकवाड | Published: August 20, 2022 08:23 PM2022-08-20T20:23:49+5:302022-08-20T20:25:05+5:30

प्राचार्य रा.रं. बोराडे यांनी सांगितल्या ‘पाचोळा’च्या प्रसवकळा

50 yrs of Pachola Novel: I wonder how I wrote Pachola by uniting with a woman: Principal R.R. Borade | 'पाचोळा'ची पन्नाशी: एका बाईशी एकरूप होऊन मी कादंबरी कशी लिहिली याचे मलाच आश्चर्य: रा.रं. बोराडे

'पाचोळा'ची पन्नाशी: एका बाईशी एकरूप होऊन मी कादंबरी कशी लिहिली याचे मलाच आश्चर्य: रा.रं. बोराडे

googlenewsNext

- शांतीलाल गायकवाड
औरंगाबाद:
स्वातंत्र्योत्तर काळात आयते कपडे मिळू लागल्याने शिंप्याच्या व्यवसायावर आलेल्या गंडांतरावर बेतलेली पाचोळा ही कादंबरी. अस्सल ग्रामीण बोली भाषेतील या कादंबरीची नायिका पार्बती. पार्बती ही गंगारामची बायको ती ही कथा सांगते. ती एवढ्या नैसर्गिकपणे सांगते की, मला आश्चर्य वाटते. एका बाईशी एकरूप होऊन मी ही कथा कशी लिहू शकलो. हे कसे घडले? हे सांगतांना प्राचार्य रा.रं. बोराडे यांच्या चेहऱ्यावर पाचोळाच्या प्रसव कळा आजही जाणवत होत्या.

पाचोळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या कादंबरीच्या निर्मिती मागील प्रेरणा आहेत तरी कोणत्या, हे जाणून घेताना रा.रं. बोराडे यांनी त्या लेखन काळातील तब्बल तीन वर्षातील काही प्रसंग साक्षात उभे केले. केवळ ग्रामीण बोली भाषा हेच या कादंबरीचे वैशिष्ट्य नाही. तर या कादंबरीचा नायक गंगाराम हा पुरुष असला तरी कथा सांगते, ती त्याची बायको पार्बती. तीच या कादंबरीची खरी नायिका. पाचोळाची सुरुवातच ती करते. आता मी महिलेच्या कायेत कसा शिरलो, तब्बल तीन वर्ष मी एका महिलेचे जीवन जगलो. कादंबरीचे तीन वर्षात तीन खर्डे लिहून काढले. तेव्हा ती पूर्णत्वास गेली. आता मागे वळून पाहतांना मलाच याचे आश्चर्य वाटते.

आनंद आणि खेदही
गेली ५० वर्ष पाचोळा वाचली जातेय. विविध भाषेत वाचली जातेय. ११ आवृत्या निघाल्या. विविध भाषेत ती भाषांतरीत झाली. याचा आनंद आहेच; पण ५० वर्ष मोठा काळ आहे. या काळात फक्त ११ आवृत्त्या निघाल्या हे खटकतेच. लोक वाचत होते तर, अधिक आवृत्या का निघू शकल्या नाहीत, याचा खेदच वाटतो, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले.

मायबापाला मुलगा साहित्यिक होणे आवडते का?
आता अशी परिस्थिती निर्माण झालीय की, कोणत्याच आईबापाला आपला मुलगा साहित्यिक झालेले आता आवडत नाही. अगदी बालपणापासून त्याला डॉक्टर, इंजिनिअर, आयआयटीची स्वप्न पडणारे कोर्स लावले जातात. मुलांच्या हातात कथा, कादंबरी देणारे मायबाप निर्माण झाले तरच, मराठीला पुढे काही भवितव्य असेल, असे सांगून ते म्हणाले, लोक आजकाल पुस्तके विकत घेईनाशी झाले आहेत. मराठी साहित्य, भाषा टिकवायची असेल तर मराठी भाषिकांनी पुस्तक विकत घेऊन ते वाचले पाहिजे. आपल्या महिन्याच्या किराण्यात एका पुस्तकाचे नाव असलेच पाहिजे, असा माझा आग्रह आहे. मी आजही या वयात पुस्तके विकत घेऊनच वाचतो. आजही काही ताकदीचे तरुण लेखक मराठीत आहेत.

मी आता थांबलोय.
गेली ६५ वर्ष मी लिहितोय. एका वाङ्मय प्रकारात मी अडकून पडलो नाही. साहित्यातील प्रत्येक वाङ्मय प्रकार मी हाताळला. आता मी थकलोय. नवीन क्रियेटिव्ह लिहिला आले तरच लिहिले पाहिजे. ते आता शक्य नाही. म्हणून आता मी लेखन थांबविण्याचा निर्णय घेतलाय. परंतु वाचन मी थांबविलेले नाही. अर्थात आता पुरेसे दिसत नाही. म्हणून एका वाचकाकडून मी ते वाचून घेतो आहे. दररोज सकाळी एक तास मी वाचून घेतो.

दोन दिवसात पाचोळा...
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लेखकाचे पुस्तक लागणे हा आनंदाचा क्षण असतो. पाचोळाही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लागले. मला आनंद झाला. दोन महिन्यानंतर एका पुस्तक विक्रेत्याचा मला फोन आला. त्याने पाचोळावर गाईड आल्याचे सांगितले. मी उत्सुकतेने गेलो. विक्रेत्याने पुस्तक हातात ठेवले व धडकन जमिनीवर आदळावे तसे झाले. त्या गाईडचे शीर्षक होते, ‘दोन दिवसात पाचोळा’ , आता बोला.

Web Title: 50 yrs of Pachola Novel: I wonder how I wrote Pachola by uniting with a woman: Principal R.R. Borade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.