परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २ संच सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 18:38 IST2017-08-08T18:36:57+5:302017-08-08T18:38:31+5:30
नविन औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मे.वॅ. क्षमतेचे 3 संच गेल्या 2 महिन्यांपासून बंद होते या 3 संचा पैकी दोन संच चालू करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २ संच सुरु
ऑनलाईन लोकमत / संजय खाकरे
परळी (बीड ), दि ८ : नविन औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मे.वॅ. क्षमतेचे 3 संच गेल्या 2 महिन्यांपासून बंद होते या 3 संचा पैकी दोन संच चालू करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी 250 मे.वॅ. क्षमतेच्या संच क्र. 7 हा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली चालू करण्यात आल्या आहेत. या संचातून बुधवारी पहाटे पासून प्रत्यक्षात वीज निर्मितीस प्रारंभ होणार आहे. तर 250 मे. वॅ. क्षमतेच्या संच क्र. 6 हा बुधवारी चालू करून राञीच्या वेळी त्यातून वीज निर्मिती सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न येथील स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहेत. त्यामुळे हे दोन्ही संच बुधवार पासून सुरू होणार असल्याची माहिती परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
गेल्या 2 महिन्यांपासून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील व नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच बंद असल्याने परळीच्या व्यापार पेठेवर परिणाम जाणवला आहे. मार्केटमधील उलाढाल मंदावली आहे. कंञाटदार व खासगी कामगारांना कामच नसल्याने त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. अनेक कामगार कामासाठी परळी सोडून गेले. राज्यातील वीज निर्मिती वाढून वापर कमी झाल्याने अनेक ठिकाणचे संच बंद करण्याचा निर्णय शासनाच्या ऊर्जा विभागाने घेतला होता. त्यात नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच तर जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 2 संच बंद ठेवले होते. जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच तर गेल्या 2 वर्षापासून बंद आहेत.
परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नविन औष्णिक विद्युत केंद्रातील 3 संच गेल्या 2 महिन्यांपासून वीज निर्मितीचा खर्च परवडत नसल्याने शासनाच्या आदेशानुसार बंद केले होते. यापैकी 2 संच सुरू करण्याच्या हालचाली मंगळवार पासून चालू झाल्या आहेत. या 2 ही संचातून प्रत्यक्षात बुधवार पासून वीज निर्मिती पुन्हा सुरू होईल. शासनाच्या ऊर्जा विभागाच्या सुचना मिळाल्यानंतर हे दोन्ही संच सुरू करण्यात येत आहेत.
माजी मंञी पंडीतराव दौंड म्हणाले की, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील बंद संच सुरू करावेत यासाठी आपण संबंधीत वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही ऊर्जामंञी बावन्नकुळे यांची भेट घेवून परळीचे सर्व संच सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच ग्रामविकासमंञी पंकजा मुंडे यांनी ही परळीचे संच सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. लोकमतने ही या संदर्भात वेळोवेळी बातम्या प्रकाशीत करून लोकप्रतिनिधींचे व विद्युत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
नविन औष्णिक विद्युत केंद्रातील 2 संच सुरू होत असले तरी जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील 2 वर्षापासून बंद असलेले संच सुरू करण्याच्या बाबतीत अद्याप ही काही निर्णय झालेला नसल्याचे समजते.