जागतिक अ‍ॅथलेटिक्स : फ्रेजर-प्राईस, फेलिक्स यांचा ‘सुवर्ण’ विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 04:24 AM2019-10-01T04:24:16+5:302019-10-01T04:24:54+5:30

जमैकाची दिग्गज वेगवान धावपटू शैली आॅन फ्रेजर-प्राईसने १०० मीटरमध्ये अभूतपूर्व असे चौथे जेतेपद पटकावले, तर अमेरिकेची महान धावपटू एलिसन फेलिक्सने उसेन बोल्टचा सुवर्णपदकांचा विक्रम मोडला.

World Athletics: Fraser-Price, Felix's 'Gold' Record | जागतिक अ‍ॅथलेटिक्स : फ्रेजर-प्राईस, फेलिक्स यांचा ‘सुवर्ण’ विक्रम

जागतिक अ‍ॅथलेटिक्स : फ्रेजर-प्राईस, फेलिक्स यांचा ‘सुवर्ण’ विक्रम

Next

दोहा : जमैकाची दिग्गज वेगवान धावपटू शैली आॅन फ्रेजर-प्राईसने १०० मीटरमध्ये अभूतपूर्व असे चौथे जेतेपद पटकावले, तर अमेरिकेची महान धावपटू एलिसन फेलिक्सने उसेन बोल्टचा सुवर्णपदकांचा विक्रम मोडला. आई झाल्यानंतर विश्व चॅम्पियनशिपमध्ये या दोन्ही खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. एलिसनने १२वे जागतिक सुवर्ण पदक जिंकताना जमैकाचा दिग्गज धावपटू उसेन बोल्टच्या ११ सुवर्ण पदकांचा विश्वविक्रम मागे टाकला.

बाळांच्या जन्मानंतर फ्रेजर-प्राईस व फेलिक्स या दोन्ही धावपटू प्रथमच कुठल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आहेत. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मामुळे २०१७ च्या विश्व चॅम्पियनशिपला मुकलेली ३२ वर्षीय फ्रेजर-प्राईसने १०.७१ सेकंद वेळेसह १०० मीटरचे जेतेपद पटकावले. ब्रिटनची दिना एशर स्मिथने १०.८३ सेकंद वेळेसह रौप्य, तर आयव्हरी कोस्टच्या मेरी जोसे ता लाऊने १०.९० सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकावले.

जमैकाच्या फ्रेजर-प्राईसने यापूर्वी २००९, २०१३ आणि २०१५ मध्येही विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. स्टेडियममध्ये व्हिक्टरी लॅप लगावताना तिचा दोन वर्षांचा मुलगा जियोनही तिच्यासोबत होता. गेल्या नोव्हेंबरमध्ये मुलगी कॅमरिनच्या जन्मामुळे फेलिक्सने जुलैमध्ये १३ महिन्यानंतर पुनरागमन केले होते.

दोहामध्ये वैयक्तिक ४०० मीटर स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यात अपयशी ठरलेली ३३ वर्षीय फेलिक्सने ४ बाद ४०० मीटर मिश्र रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले. अमेरिकेचा संघ ३ मिनिट ९.३४ सेकंदाच्या विक्रमी वेळेसह जेतेपदाचा मानकरी ठरला. (वृत्तसंस्था)

टेलरची तिहेरी उडीत जेतेपदाची हॅट््ट्रिक

अमेरिकेच्या ख्रिस्टियन टेलरने तिहेरी उडी स्पर्धेत जेतेपदाची हॅट््ट्रिक नोंदवली. दोनवेळची आॅलिम्पिक चॅम्पियन आणि आता चारवेळची विश्व चॅम्पियन २९ वर्षीय टेलरने १७.९२ मीटर अंतरासह सुवर्णपदकावर नाव कोरले. अमेरिकेच्याच विल क्ले (१७.७४ मी.) व बुरकिना फासो की ह्यूज फेब्रिस जांगो (१७.६६ मी.) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

भाला फेकमध्ये अन्नू राणी अंतिम फेरीत
भारताची महिला भालाफेकपटू अन्नू राणीने राष्ट्रीय विक्रम नोंदवत अ गटातून अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह जागतिक स्पर्धेत भालाफेक खेळाची अंतिम फेरी गाठणारी अन्नू पहिली भारतीय महिला ठरली. अन्नूने आपल्या तीन प्रयत्नात ६२.४३ अशी सर्वोत्तम फेक केली. मार्चमध्ये अन्नूने ६२.३४ फेक करुन राष्ट्रीय विक्रम केला होता. लियू शियिंग (६३.४८, चीन) व रतेज मार्टिना (६२.८७, स्लोवेनिया) यांनी अनुक्रमे पहिले दोन स्थान पटकावले.

भारताचा मिश्र रिले संघ सातव्या स्थानी
भारताचा ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघाने आपली सर्वोत्तम कामगिरी केली खरी, मात्र यानंतरही संघ अंतिम फेरीत सातव्या स्थानी राहीला. मोहम्मद अनस, व्हीके विसमया, जिस्ना मॅथ्यू व टॉम निर्मल नोह यांच्या संघाला ३ मिनिट १५.७७ सेकंद वेळेसह आठ संघाच्या अंतिम फेरीमध्ये सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाने गतवर्षी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावताना ३ मिनिट १५.७१ सेकंदाची वेळ नोंदवली होती.

अनसने आठव्या लेनपासून सुरुवात केली व दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला विसमया अखेरच्या स्थानापर्यंत गेली. तिसºया टप्प्यात विसमयाकडून बेटन घेताना जिस्नाची दुसºया देशाच्या धावपटूसोबत टक्कर झाली. त्यामुळे महत्त्वाचा वेळ वाया गेला. दरम्यान, त्यावेळी भारतीय संघ अखेरच्या स्थानी होता. नोहने अखेरच्या टप्प्यात पुनरागमन करून दिले, पण भारत केवळ ब्राझीलच्या पुढे सातव्या स्थानी राहिला.

अमेरिकेने ३ मिनिट ९.३४ सेकंदाच्या विश्व विक्रमी वेळेसह सुवर्ण जिंकले. या स्पर्धेत प्रथमच मिश्र रिलेचा समावेश केला आहे. जमैकाने ३ मिनिट ११.७८ सेकंद वेळेसह दुसरे, तर बहरीनने ३ मिनिट ११.८२ सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले.

Web Title: World Athletics: Fraser-Price, Felix's 'Gold' Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.