ZP Election : 'फडणवीसांच्या मेहनतीचा अन् उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल दिसला'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 01:28 PM2021-10-07T13:28:39+5:302021-10-07T13:29:03+5:30

कौर यांनीही फडणवीसांची री ओढली, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाचं कौतुकही केलंय. पोटनिवडणुकीतील निकालातून हे स्पष्ट होत आहे की, महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला साथ दिली अन् कोणाला नाही

ZP Election: 'Fadnavis's hard work shows Uddhav Thackeray's dishonesty', MP Navneet kaur rana on shiv sena | ZP Election : 'फडणवीसांच्या मेहनतीचा अन् उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल दिसला'

ZP Election : 'फडणवीसांच्या मेहनतीचा अन् उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल दिसला'

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री जरी महाराष्ट्राचे असले, तरी निकाल पाहिल्यास भाजपच्या बाजूने लागल्याचे दिसून येते. कारण, शिवसेनेनं भाजपा युतीसोबत विश्वासघात करुन खुर्चीच्या लालसेपोटी तिघडी सरकार बनवले.

मुंबई - विदर्भातील 5 जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील पोटनिवडणुकींच्या निकालाबाबत भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसेच, या निकालातून भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं सिद्ध झालं असून सत्तेतील शिवसेना चौथ्या नंबरवर फेकल्याचंही त्यांनी सांगितलं. आता, अमरावतीच्या खासदार नवनीत कौर यांनीही हा भाजपचाच विजय असल्याचे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

पोटनिवडणुकांमधील 225 पैकी 55 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे, म्हणजेच 25 टक्के जागा भाजपाने जिंकल्या आहेत. त्याबद्दल, जनतेचे आभार मानतो, असे फडणवीस यांनी म्हटल होते. आता, कौर यांनीही फडणवीसांची री ओढली, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाचं कौतुकही केलंय. पोटनिवडणुकीतील निकालातून हे स्पष्ट होत आहे की, महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला साथ दिली अन् कोणाला नाही. मुख्यमंत्री जरी महाराष्ट्राचे असले, तरी निकाल पाहिल्यास भाजपच्या बाजूने लागल्याचे दिसून येते. कारण, शिवसेनेनं भाजपा युतीसोबत विश्वासघात करुन खुर्चीच्या लालसेपोटी तिघडी सरकार बनवले. महाराष्ट्राच्या जनतेनं आज त्यालाच उत्तर दिलंय, असे म्हणत खासदार नवनीत कौर यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत. 

फडणवीस हे माजी मुख्यमंत्री असतानाही, मुख्यमंत्र्यांच्या तिपटीने फिरत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जातात, लोकांचे दु:ख ऐकून घेतात, समजून घेतात, त्यावर मार्ग काढायचा प्रयत्न करतात. म्हणून, महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना साध दिलीय. जनता जी दुखावली होती, त्यांनी आज त्यांची भूमिका निकालातून मांडलीय. फडणवीसांच्या मेहनतीचा अन् उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा हा निकाल दिसल्याची घणाघाती टीकाही कौर यांनी केली आहे. 

दरम्यान, सहा जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारली आहे. पण, स्वंतत्रपणे विचार केल्यास भाजपला सर्वाधिक जागा जिंकता आल्या आहेत.  

झेडपीत भाजपला २३ जागा

जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीपैकी सर्व ८५ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये, ४६ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या ८५ पैकी काँग्रेसने १७, राष्ट्रवादीने १७ आणि शिवसेनेने १२ अशा मिळून महाविकास आघाडीने आतापर्यंत ४६ जागा जिंकल्या. तर भाजपाने २३ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित १६ जागा इतर पक्षांच्या खात्यात गेल्या आहेत. 
 

Web Title: ZP Election: 'Fadnavis's hard work shows Uddhav Thackeray's dishonesty', MP Navneet kaur rana on shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.