माझ्याशी बोल अन्यथा ‘ते’ फोटो व्हायरल करेन; २० वर्षीय तरुणीला धमकी, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 17:53 IST2022-08-26T17:52:17+5:302022-08-26T17:53:10+5:30
लग्नाचे आमिष देऊन वारंवार बळजबरी, नंतर नकार; गुन्हा नरखेड पोलीस ठाण्यात वर्ग

माझ्याशी बोल अन्यथा ‘ते’ फोटो व्हायरल करेन; २० वर्षीय तरुणीला धमकी, गुन्हा दाखल
अमरावती : माझ्याशी बोल, अन्यथा ‘ते’ फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी एका २० वर्षीय तरुणीला देण्यात आली. तत्पूर्वी लग्नाचे आमिष देऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. १० मे पूर्वी घडलेल्या या प्रकरणी शेंदुरजनाघाट पोलिसांनी २५ ऑगस्ट रोजी दुपारी आरोपी पुनित वसंतराव वैद्य (२३, रा. मोवाड, ता. नरखेड, जि. नागपूर) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
वरूड तालुक्यातील एका २० वर्षीय तरुणीची यावर्षीच्या सुरुवातीला मोवाडच्या पुनितशी ओळख झाली. परिचयातून मैत्री झाली. मोबाईल संवाद वाढला. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. त्याने लग्न करण्याचे अभिवचन देखील दिले. अशातच मे महिन्यात आरोपीने तिला मोवाड येथे बोलावून घेतले. तेथे तिच्या मनाविरुद्ध शारीरिक बळजबरी केली. त्यानंतरही त्याने वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. काही दिवसांनंतर तिने त्याला लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, त्याने होकार वा नकार न देता केवळ टोलवटोलवी केली.
फोनहून धमकी
आरोपी पुनित हा लग्न करत नाही, असे लक्षात येताच तिने त्याचे मोबाईल कॉल उचलणे बंद केले. एकदा कॉल रिसिव्ह केला असता, तू माझ्यासोबत का बोलत नाहीस, माझा कॉल का घेत नाहीस, अशी विचारणा केली. तथा माझ्याशी बोल, अन्यथा तुझे फोटो तुझ्या घरच्यांना दाखवेल. सोशल व्हायरल करून तुझी बदनामी करेन, अशी धमकी देऊन तिला शिवीगाळ केली. आरोपीचा त्रास असह्य झाल्याने अखेर तिने पोलीस ठाणे गाठले. दरम्यान घटनास्थळ पाहता हा गुन्हा नरखेड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.