एसटीने चिरडल्याने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST2019-09-14T06:00:00+5:302019-09-14T06:00:55+5:30
बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही उतारांना अपघाताची वाढती संख्या पाहता, तेथे गतिरोधके लावण्यात आली आहेत. तरीही अपघातांना आळा घालता आलेला नाही. शुक्रवारी सकाळी जुनी वस्तीतील माळीपुरा येथील रहिवासी शुभम वाठ हा काही कामानिमित्त नवी वस्तीत एमएच २७ सीजी ३९२४ या क्रमांकाच्या दुचाकीने गेला होता.

एसटीने चिरडल्याने तरुणाचा मृत्यू
बडनेरा : भरधाव एसटीखाली चिरडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी जुनीवस्ती स्थित गांधी विद्यालयाजवळील मुख्य मार्गावर घडली. शुभम अविनाश वाठ (१७) असे मृताचे नाव आहे. अपघातप्रकरणी बडनेरा पोलिसांनी बसचालकास अटक केली. एसटी बस जप्त करण्यात आली आहे.
बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही उतारांना अपघाताची वाढती संख्या पाहता, तेथे गतिरोधके लावण्यात आली आहेत. तरीही अपघातांना आळा घालता आलेला नाही. शुक्रवारी सकाळी जुनी वस्तीतील माळीपुरा येथील रहिवासी शुभम वाठ हा काही कामानिमित्त नवी वस्तीत एमएच २७ सीजी ३९२४ या क्रमांकाच्या दुचाकीने गेला होता. काम आटोपून परत दुचाकीने येताना रेल्वे उड्डाणपुलावरून जुनी वस्तीतील गांधी विद्यालयाकडे वळण घेत असताना शुभमच्या दुचाकीला अमरावतीहून नेरकडे जाणाऱ्या एसटी बस (एमएच ४० वाय ५२८७) ने जबर धडक दिली. शुभम एसटीच्या मागील चाकात आला. त्याच्या डोक्यावरून एसटीचे चाक गेले. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
भरदिवसा घडलेल्या या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. बघ्यांची प्रचंड गर्दी अपघातस्थळी जमली. घटनेच्या माहितीवरून तेथून काही अंतरावर असणाºया बडनेरा ठाण्यातील पोलीस घटनास्थळी धावून गेले. पोलिसांनी एसटी चालकास ताब्यात घेऊन शुभमचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला.
शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवगारात ठेवण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूमुळे बडनेरातील जुनी वस्ती परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.