यंदा कपाशीची फक्त १६० किलो उत्पादकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:00 IST2017-12-18T21:59:57+5:302017-12-18T22:00:17+5:30
यंदा गुलाबी बोंड अळीच्या संकटाने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवर कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले.

यंदा कपाशीची फक्त १६० किलो उत्पादकता
आॅनलाईन लोकमत
अमरावती : यंदा गुलाबी बोंड अळीच्या संकटाने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवर कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचा प्राथमिक नजरअंदाज उत्पादकता अहवाल काय दर्शवितो, याची शेतकऱ्यांना उत्सुकता होती. कापसाचे (रूई)े हेक्टरी १६० किलो उत्पादन होणार असल्याचा अहवाल शासनाला सादर झाल्याची माहिती आहे.
यंदाच्या हंगामात बीटी कपाशीवर आॅक्टोबर महिन्यापासूनच बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय समितीने केलेल्या पंचनाम्यात ९६ टक्क््यांपर्यंत बोंडे किडली असल्याचे अहवालाद नमूद केलेले आहे. या समितीमध्ये कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचादेखील सहभाग आहे. हे ‘जीएचआय’ प्रमाणपत्र कृषी संचालकांनादेखील सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागद्वारा जाहीर करण्यात येणारी प्राथमिक नजरअंदाज उत्पादकता काय राहते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आता हेक्टरी १६० किलो उत्पादन अपेक्षित असल्याचा अहवाल कृषी सहसंचालकांना सादर झाला व हीच उत्पादकता शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
यंदा पेरणीपासून कमी पावसाने शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची संकट ओढवले. यामधून जी कपाशी बचावली, त्यावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकात ‘रोटाव्हेटर’ फिरविले. जिल्ह्यात यंदा २ लाख ७ हजार ४५७ हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे. मात्र, बीटीमध्ये बोंडअळीला प्रतिरोध करण्याचा जीन्स असताना बियाणे कंपन्यांनी दुय्यम दर्जाची बियाणे विक्री केल्यामुळेच संकट ओढावले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रयोगशाळेच्या परीक्षणाअंतीदेखील पाच कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये गुलाबी बोंड अळीला मारक क्षमता नसल्याने सिद्ध झाल्याने शासनानेदेखील या कंपन्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी केंद्र शासनाकडे केली असल्याने शेतकऱ्यांच्या आरोपाला बळ मिळाले आहे.
पीकविम्याचा मिळावा लाभ
यंदाचा खरीप हंगाम सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पावसाने उद्ध्वस्त झाला. पावसात सलग खंड राहिला आहे. त्यामुळे एनडीआरएफ व पीक विम्याच्या निकषानुसार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळायला पाहिजे. आता तर कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने ३३ टक्क््यांवर नुकसान झाले आहे. ही दोन्ही आपत्ती भरपाई मिळण्यास पात्र असल्याने शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.