आठ आरोग्य लेखाशीर्षातील कामे : प्रशासकीय मान्यता यादीत नमूद
By Admin | Updated: January 5, 2017 00:10 IST2017-01-05T00:10:54+5:302017-01-05T00:10:54+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभागाद्वारे प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामात कोटींचा अपहार झाल्याची बाब उजेडात आली आहे.

आठ आरोग्य लेखाशीर्षातील कामे : प्रशासकीय मान्यता यादीत नमूद
पीएचसीच्या कामात कोटींचा अपहार !
अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाद्वारे प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामात कोटींचा अपहार झाल्याची बाब उजेडात आली आहे. ८ आरोग्य लेखाशिर्षात एकाच विकासकामाची चार ते पाच वेळा देयके काढण्यात आली आहेत, हे विशेष.
राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त १३ कोटी १३ लाखांच्या निधीत मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांत सन २०१५-१६ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे एकच काम वारंवार विविध नावाने दाखवून तब्बल पाच कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. झेडपीच्या आरोग्य विभागाला राज्याच्या आरोग्य विभागाद्वारे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात आरोग्य संस्थांची स्थापना व परीक्षण बांधकामांसाठी १३ कोटी १३ लाख २८ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची दुरूस्ती व बांधकामासाठी कामांचे नियोजन करून त्यासाठी निधीची तरतुद करण्यात आली. यानुसार याकामांसाठी ३ ते ५ लाख रूपयांप्रमाणे निधी देण्यात आला. यासाठी प्रशासकीय मान्यता व इतर सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले. प्राप्त १३ कोटी १३ लाख रूपयांमधून बिजुधावडी, साद्राबाडी, हरीसाल, सेमाडोह, हातरू, धूळघाट रेल्वे, काटकुंभ आदी ठिकाणी कामे करण्यात आलीत. यापैकी बरीच कामे प्रगतीपथावर आहेत तर काही कामे अद्याप सुरू झाली नसल्याचे यादीत दर्शविण्यात आले आहे. एकटया बिजुधावडी या एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल १ कोटी ४८ लाखांची कामे एकाच वर्षात मंजूर केली आहेत. विशेष म्हणजे एकच काम विविध ठिकाणी वारंवार प्रस्तावित दाखवून त्या कामांसाठी निधीची पार वाट लावल्याचे दिसून येते.
ई-टेंडरिंग नसल्याने घोळ
शासनाने जिल्हा परिषदेला आरोग्य सुविधेसाठी कोटयवधीचा निधी उपलब्ध करून दिला. यानुसार विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार यानिधीत सर्वाधिक पैसा मेळघाटक्षेत्राला मिळाला. त्यात कामे मंजूर केली गेली. विशेष म्हणजे बहुतेक कामे ही ३ लाखांची असल्यामुळे या कामांचे ई-टेंडरिंग केले जात नाही. परिणामी यात पाणी मुरत असल्याची शंका व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सन २०१५-१६ मध्ये कामे केल्यानंतर काही ठिकाणची कामे पुन्हा सन २०१६-१७ मध्येही प्रस्तावित केली आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
‘आठ आरोग्य’ अंतर्गत मेळघाटसह इतर ठिकाणी करण्यात आलेल्या कामांची चौकशी करू. निधीमध्ये अपहार व कामांमध्ये अनियमितता आढळल्यास दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. कोणाचीही गय करणार नाही.
- सतीश उईके, अध्यक्ष
जिल्हा परिषद