८४० ग्रामपंचायतीत जलस्रोतांची निगा राखणार महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 05:00 IST2022-01-30T05:00:00+5:302022-01-30T05:00:58+5:30
जिल्हा परिषदेच्यावतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी एच टू एस व्हायरल खरेदी करण्यात येणार आहे. या किटमध्ये लहान काचेच्या बाटलीत स्त्रोताचे पाणी भरून ही बाटली उन्हापासून दूर ४८ तासात ठेवण्यात येणार आहे. बाटलीतील पाण्याला पिवळा रंग येतो. तो आहे तसाच राहिल्यास पिण्यास योग्य, अन्यथा काळा झाल्यास पाणी पिण्यास अयोग्य आहे. या पाणी स्रोताचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत देण्यात येणार आहे.

८४० ग्रामपंचायतीत जलस्रोतांची निगा राखणार महिला
जितेंद्र दखने
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामविकासात महिलांचा सहभागी कितपत, हा प्रश्न ५० टक्के आरक्षण मिळाल्यानंतरही केला जातो. तथापि, या प्रश्नाला प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या जबाबदारीतून महिलांनी दिला आहे. आता नवी जबाबदारी पाण्याची गुणवत्ता तपासण्याची आहे. जिल्ह्यात ८४० ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ७ हजार ८७१ पाण्याच्या स्रोतांची जैविक तपासणी फील टेस्ट किटद्वारे केली जात आहे. त्यात महिलांचा सहभाग राहणार आहे.
जिल्हा परिषदेच्यावतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी एच टू एस व्हायरल खरेदी करण्यात येणार आहे. या किटमध्ये लहान काचेच्या बाटलीत स्त्रोताचे पाणी भरून ही बाटली उन्हापासून दूर ४८ तासात ठेवण्यात येणार आहे. बाटलीतील पाण्याला पिवळा रंग येतो. तो आहे तसाच राहिल्यास पिण्यास योग्य, अन्यथा काळा झाल्यास पाणी पिण्यास अयोग्य आहे. या पाणी स्रोताचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत देण्यात येणार आहे. दूषित आलेल्या नमुन्यांचा अहवाल आरोग्य सेवकांमार्फत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला जाणार आहे.
जि.प. पुरविणार किट
जिल्ह्यात ८४० ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत ७८७१ पाण्याची जैविक फिल्ड टेस्ट किट पुरविण्यात येणार आहे. याद्वारे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांची पाणी गुणवत्ता तपासणी केली जाईल. पाण्याची शास्त्रोक्त पद्धतीने गुणवत्ता तपासणी कशी करावी, स्रोतांची निगा कशी राखावी व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम पाणी गुणवत्ताविषयक तपासणी फिल्ड टेस्ट किटचा वापर कसा करावा, त्याचा वापर करून कशी तपासणी केली जाते, तसेच हे किट कसे हाताळावे याबाबत माहिती दिली जात आहे.
महिलांचा सहभाग
जैविक पाणी स्रोत तपासण्यासाठी प्रथमच महिलांचा सहभाग घेण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ५ महिलांची निवड करण्यात आली आहे.
जैविक तपासणी म्हणजे काय?
पिण्याच्या पाण्यामध्ये काही जैविक घटक जिवाणू, विषाणू आहेत का, हे पाहण्यासाठी होणाऱ्या तपासणीस जैविक तपासणी म्हणतात. जैविक तपासणी साधारणत: तीन महिन्यांतून एकदा केली जाते.