अमरावती जिल्ह्यातील मुख्यमंत्री दत्तक गावात महिलांचा पाण्यासाठी ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 13:10 IST2019-03-28T13:07:51+5:302019-03-28T13:10:27+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम परिवर्तन अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील महिलांनी पाण्यासाठी बुधवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

अमरावती जिल्ह्यातील मुख्यमंत्री दत्तक गावात महिलांचा पाण्यासाठी ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम परिवर्तन अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील महिलांनी पाण्यासाठी बुधवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या गावात एका आठवड्याहून अधिक कालावधीनंतर पाणीपुरवठा होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी ग्राम परिवर्तन विकास अभियानात विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, जलशुद्धीकरण केंद्रासह छोटी-मोठी कामे झाली तरी पाण्यासाठी आजही येथील महिलांना हातपंपावर जाऊन उपसा करावा लागतो. धगधत्या उन्हाने व सतत पावसाळा कमी झाल्याने भूगर्भातील जलाशयाची पातळी अधिकच खोलवर गेली आहे. गावातील महिला १२ वाजता शिवारातून मोलमजुरी करून आल्या की, पाण्यासाठी भटकंती ठरलेली आहे.
आधीच केली होती मागणी
गावात ग्राम परिवर्तन विकासाचा आराखडा तयार झाला तेव्हा पाणीगळती थांबविण्यासाठी नवीन लोखंडी पाइप लाइन, एकूण ४५२ नळांना मीटरची मागणी केली होती. पण, निधी नसल्याचे सांगत ती फेटाळली गेली.
उपाययोजना सुरू
ग्रामपंचायतने तात्काळ उपाययोजनांसाठी चौदाव्या वित्त आयोगातून दीड लाखांचे नियोजन करण्यात आले. यामधून ग्रामपंचायत मालकीच्या दोन विहिरींचे खोलीकरण केले जाणार असून, एका विहिरीचे अकरा फूट खोदकाम झाले आहे. आणखी दोन विहिरी अधिग्रहीत करणार असल्याचे मत ग्रामपंचायत प्रशासनाने मांडले आहे.
शासनाने गाव दत्तक घेतले; मात्र ते मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैव आहे. पाण्याची पातळी कमी झाली असली तरी ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नागरिक सहन करीत आहेत.
- शरद वानखडे, ग्रामपंचायत सदस्य