मेळघाट वनविभागातील महिला एसीएफने व्हाॅट्स ॲपवर टाकली सुसाईड नोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2022 21:15 IST2022-04-12T21:13:09+5:302022-04-12T21:15:25+5:30
Amravati News ¯ दीपाली चव्हाण आत्महत्या घटनेला जेमतेम वर्ष होत असतानाच मेळघाट वनविभागातील आणखी एका महिला सहाय्यक वनसंरक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्याने वॉटसअपवर सुसाईड नोट टाकल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली.

मेळघाट वनविभागातील महिला एसीएफने व्हाॅट्स ॲपवर टाकली सुसाईड नोट
अमरावती : मेळघाट वन विभागातील सहायक वनसंरक्षक (एसीएफ) पदावर असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे आत्महत्या करीत असल्याचे पत्र वन कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या व्हाॅट्स ॲप ग्रुपवर टाकले आणि काही वेळात ते डिलिट करीत, या खळबळजनक कृतीबद्दल माफी मागितली. ज्यांच्याकडे हा मेसेज असेल, त्यांनीसुद्धा तो डिलिट करावा, अशी विनंतीही केली. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाला एक वर्ष झाले असताना, हा दुसरा प्रकार धक्का देणारा ठरला आहे.
विद्या वसव असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. १० एप्रिल रोजी त्यांनी ‘मेळघाट टेरिटोरियल’ या ग्रुपवर दीड पानाची सुसाईड नोट टाकली आणि वन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये एकच भूकंप आला. काही वेळानंतर ते पत्र त्यांनी डिलिट केले. मात्र, त्यापूर्वी अनेकांनी ते वाचले आणि व्हायरलदेखील झाले.
घालून पाडून बोलतात... मुलाची काळजी घ्यावी...
उपवनसंरक्षक गिन्नी सिंग या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांनी ८ एप्रिल रोजी, रानगव्याने एका आदिवासी इसमाला गंभीर जखमी केल्याची माहिती रात्री साडेदहाच्या सुमारास दिली. त्यानंतर मुलगा मोबाईल खेळत असल्याने मोबाईल स्विच ऑफ झाला. त्यामुळे रात्री या विषयावर संवाद झाला नाही. त्यासंदर्भात माफी मागितली तरीदेखील उपवनसंरक्षक ग्रुपवर घालून-पाडून बोलतात. वारंवार कार्यालयात बोलावून लिपिक, लेखापालासमोर दमदाटी करतात. हा मानसिक त्रास सहन होत नाही. माझ्या चुकीबद्दल फाशीची शिक्षा करून घेत आहे. माझ्या मुलाची काळजी घ्यावी, असे मेळघाट प्रादेशिक वन विभागांतर्गत अंग व धारणीचा पदभार असलेल्या एसीएफ विद्या वसव यांनी पत्रात नमूद केले.
डीएफओची स्तुती
विद्या वसव यांनी, तणावात असल्याने सुसाईड नोट लिहिल्याचे सांगत ती डिलिट केली. डीएफओ मॅडमनी नेहमीच सपोर्ट केला आहे. माझ्याकडून चूक झाली होती. मी माझ्याकडून मागितलेली माहिती वेळेत दिली नाही. वरणगावात जखमी झालेल्या रुग्णाची प्रकृती सध्या चांगली असल्याची पोस्ट त्याच ग्रुपवर करण्यात आली.
दोन्ही महिला अधिकारी सोबत दौऱ्यावर
संपूर्ण घटनाक्रमासंदर्भात उपवनसंरक्षक गिन्नी सिंग आणि सहायक वनसंरक्षक विद्या वसव यांच्याशी संपर्क केला असता, जारिदा येथे दौऱ्यावर या दोन्ही महिला अधिकारी असल्याचे कार्यालयीन सूत्राने सांगितले. त्यामुळे वृत्त लिहिस्तोवर संपर्क होऊ शकला नाही.