घाटावरच्या हळदीला मिळणार का अनुदानाचे टॉनिक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:01 IST2022-05-21T05:00:00+5:302022-05-21T05:01:04+5:30
‘विदर्भाच्या कॅलिफोर्निया’त संत्र्यासह हळदीचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड क्षेत्र होते. घाटावरची ही गावरान हळद विदर्भासह परप्रांतातून सुद्धा येथे व्यापारी येऊन खरेदी करायचे. हळदी मुळे शेंदूरजनाघाट हे गाव देशाच्या नकाशात झळकले होते. गतकाळी येथे हळदीच्या उत्पादनातून निघणाऱ्या कुंकवाचे कारखाने होते. या कुंकवाची निर्यात केली जायची. काळाच्या ओघात हळदीचे उत्पादन घातल्याने कुंकू कारखाने बंद पडले.

घाटावरच्या हळदीला मिळणार का अनुदानाचे टॉनिक?
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड/शेंदूरजनाघाट : शेंदूरजना घाटची हळद ही ‘घाटावरची हळद’ म्हणून विदर्भात प्रसिद्ध होती. राज्याबाहेर सुद्धा येथील हळदीला मागणी होती. हळद उत्पादकांसह मजुरांनाही यामुळे हंगामात सुगीचे दिवस यायचे. मात्र काळानुसार उत्पादन घटल्याने खर्चसुद्धा परवडत नसल्याने हळदीचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्याने आणि बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावाने हळद विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर सद्यस्थितीत आली आहे. घाटावरच्या या पिवळ्या सोन्याला उतरती कळा लागल्याने पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कृषी विभागाने मसाले पिकांना अनुदानावर लागवडीची योजना हळदीसाठी जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
‘विदर्भाच्या कॅलिफोर्निया’त संत्र्यासह हळदीचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड क्षेत्र होते. घाटावरची ही गावरान हळद विदर्भासह परप्रांतातून सुद्धा येथे व्यापारी येऊन खरेदी करायचे. हळदी मुळे शेंदूरजनाघाट हे गाव देशाच्या नकाशात झळकले होते.
गतकाळी येथे हळदीच्या उत्पादनातून निघणाऱ्या कुंकवाचे कारखाने होते. या कुंकवाची निर्यात केली जायची. काळाच्या ओघात हळदीचे उत्पादन घातल्याने कुंकू कारखाने बंद पडले. पिढीजात हळद उत्पादन घेणाऱ्या शेतकरी कुटुंबांनी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने तसेच उत्पादन खर्च वाढल्याने हळदीचे लागवड क्षेत्र कमी केले आहे.
आता बॉयलर आले
हळकुंड काढल्यानंतर ती उकाड्यावर नेऊन मोठ्या कढई मध्ये शिजवून उन्हात वाळविली जायची,शेकडो मजूर कामावर असायचे. गावात दोन उकाडे होते. उत्पादनच फारसे नसल्याचे आता एकच उकाडा सुरू आहे. कढया हद्दपार होऊन बाॅयलर आले. मजुरांची गच्छंती झाली आहे.
संरक्षणाची मागणी
बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात हळद विकून मोकळे होण्याची वेळ आली आहे. मसाले पिकात समावेश असलेल्या हळदीला संरक्षण मिळणे गरजेचे आहे. अनुदानावर लागवड करण्याची योजना आवश्यक आहे, असे शेतकरी सांगतात.
लागवड क्षेत्र घटले
उन्हाळ्यात शेतीची मशागत करून मृगाचा पाऊस आला की, हळदीची लागवड केली जाते. या पिकात एरंडी, मिरची, भेंडी, टमाटर, वाल, काकडी असे आंतरपीक असते. परंतु रोगराई, वातावरणीय बदल आणि पाण्याच्या कमतरतेमुळे दिवसेंदिवस हळदीच्या लागवड क्षेत्रात मोठी घट झाली आहे.