अमरावतीकरांना यंदाही पाण्यासाठी मोजावे लागणार का पैसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:48 IST2025-02-19T11:45:42+5:302025-02-19T11:48:14+5:30

Amravati : कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त

Will the people of Amravati have to pay for water this year too? | अमरावतीकरांना यंदाही पाण्यासाठी मोजावे लागणार का पैसे?

Will the people of Amravati have to pay for water this year too?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. शहराच्या चारही बाजूनी लोकवस्ती वाढल्याने नव्या निर्माण झालेल्या वसाहतीत आजही नळाचे पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना आपली तहान ही नळाच्या पाण्याऐवजी बोअरवेलच्या पाण्यावर भागवावी लागत आहे.


विशेष म्हणजे, शहरी भागात नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा अप्पर वर्धा धरणातून केला जातो. त्यामुळे काही भागात पिण्याच्या पाण्याचा मुबलक प्रमाणात पुरवठा होतो, तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांची तहान ही टँकरच्या पाण्यावर भागवावी लागते. टँकरद्वारे पाणीसाठा करण्यासाठी पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. तर शहरी भागात नव्याने अतित्वात आलेल्या वसाहतीमध्ये नळावाटे शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक नागरिक हे नळाच्या पाण्यासाठी लगतच्या परिसरात जाऊन पिण्याचे पाणी आणत लागते. 


१५०० रुपयांना टँकर
खासगी टैंकर चालकांनी फेब्रुवारी महिन्यापासूनच दर वाढविले आहेत. दोन हजार लिटरचा टँकर हवा असेल, तर किमान १००० ते १५०० रुपये मोजावे लागतात. घर लांब असेल, तर दरही तसेच वाढत जातात. विशेष म्हणजे पैसे मोजून टॅक्रर वेळेवर मिळत नाही.


उन्हाळ्यात पाण्यासारखे पैसे खर्च होणार
जिल्ह्यातील मेळघाटसह अन्य काही तालुक्यांतील ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा उन्हाळ्यात तीव्र होतात. यंदाही पाणीटंचाईचा सामना काही गावात करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच पाण्याकरिता पैसे खर्च होणार आहेत.


पाणी आले की लाईट गायब
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उकाड्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. परिणामी थंडाव्यासाठी कूलर, पंखे, एसी आदी इलेक्ट्रिक उपकरणांचा उपयोग वाढतो.
विजेची मागणी वाढताच अनेकदा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढतात. परिणामी ज्यावेळी पिण्याच्या पाण्याचे नळ येतात, नेमके त्याचवेळी वीजपुरवठाही गायब होते.


फेब्रुवारीपासूनच उन्हाळ्याला सुरुवात
शहराच्या आसपास असलेल्या नवीन वसाहतीमध्ये पाण्याची मागणी वाढत आहे. नागरिक नळाच्या पाण्यासाठी पैसे मोजून पिण्याकरिता पाणी मागवितात. सध्या उन्हाळ्याच्या झळा जाणवत असल्याने आगामी कालावधीत पाण्याची समस्या गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळात पिण्याची टंचाई भासते. तर शहरी भागात दर दोनदिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. यात अनेक घरात टिल्लू मशिनचा वापर करून पाणी ओढल्या जाते. यावर मात्र मजीप्रा कुठलीही कारवाई करत नाही.


टोलेजंग इमारती, दर १५ फुटांवर बोअर
सध्या शहरामध्ये पाच ते आठ मजल्यांपर्यंत टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ १५ फुटांच्या अंतरावर जमिनीमध्ये बोअर मारले असल्याने पाण्याची टंचाई जाणवते. एकाच ठिकाणी अनेक बोअर मारलेले असून यामुळे जमिनीची चाळण होऊन पाण्याची पातळी खोलवर जात असल्याचे दिसून येते. 


"शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. मात्र, नवीन वसाहतीमध्ये अद्यापही नळाचे पाणी पोहोचलेले नाही. परिणामी काही नागरिक बोअरच्या पाण्यावर तहान भागवितात. त्यामुळे अशा वसाहतीमध्ये नळावाटे पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे."
- मोहन बैलके, नागरिक


"शहरातील काही भागात कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असल्याने मोठी अडचण होते. त्यामुळे यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. याशिवाय नवीन वस्तीमध्ये नळाचे पाणी पोहोचणे आवश्यक आहे. नवीन वस्तीत नळ पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन पोहोचल्या नाहीत." 
- चंद्रशेखर मेहरे, नागरिक

Web Title: Will the people of Amravati have to pay for water this year too?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.