-तर अडसुळांना धडा शिकवेन !

By Admin | Updated: December 25, 2016 00:06 IST2016-12-25T00:06:53+5:302016-12-25T00:06:53+5:30

सातारा-बुलढाण्यातून हाकललेल्या खासदाररुपी ‘पार्सल’ची दादागिरी सहन केली जाणार नाही.

-Will teach a lesson to insomnia! | -तर अडसुळांना धडा शिकवेन !

-तर अडसुळांना धडा शिकवेन !

रवी राणांची खासदारांना तंबी : बडनेरा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे उद्घाटननाट्य
अमरावती : सातारा-बुलढाण्यातून हाकललेल्या खासदाररुपी ‘पार्सल’ची दादागिरी सहन केली जाणार नाही. त्यांनी वर्तन सुधारावे, अन्यथा वेगळ्या पद्धतीने ठीक करेन, अशी तंबी आ.रवि राणा यांनी खा.आनंदराव अडसूळ यांना दिली. ४० वर्षे राजकारणात असलेल्या ८० वर्षांच्या या म्हाताऱ्याला पुन्हा उद्घाटन करणे शोभत नसल्याची टीकाही त्यांनी केली. इतिहासात नोंद होईल, असे काम अडसुळांनी करून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
बडनेरा मार्गावरील उड्डाणपुलाच्या उद्घाटन नाट्यानंतर आ.राणा यांनी शनिवारी विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. तत्कालीन खासदार अनंत गुढे यांच्या प्रयत्नातून २००५ मध्ये नरखेड रेल्वेलाईनवर असलेल्या या उड्डाणपुलाला मान्यता मिळाली. त्यासाठी आपण तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर केंद्राने त्यासाठी १८ कोटींचा निधी दिला. मात्र ११ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटून गेल्यानंतरही उड्डाणपुलाचे काम पूर्ण न होता हा मार्ग अपघातांना आमंत्रण देणारा ठरला आहे. त्याबाबत आपल्याकडे अनेकांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतरच शुक्रवारी उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची औपचारिकता साधली.मात्र खा.आनंद अडसूळ यांनी लगेचच उड्डाणपूल गाठून पुन्हा उद्घाटन केले. ही कृती अडसुळांना शोभणारी नसल्याचे राणा म्हणाले. अडसूळ जिल्ह्यातून बेपत्ता असल्याने त्यांच्याकडून सोडविल्या जाव्यात, अशा समस्याही मलाच सोडवाव्या लागतात. उड्डाणपुलाबाबत प्रचंड तक्रारी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केल्याचे ते म्हणाले.
खा.अडसूळ हे जिल्ह्यातील विकासकामांना मिळालेला शाप आहे. मागील आठ वर्षांत त्यांनी जिल्ह्यायासाठी काहीच केले नसल्याची टीका त्यांनी केली. जिल्ह्याच्या विकासात शून्य योगदान असणाऱ्या अडसुळांनी मर्यादेत राहावे, त्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. खासदार दावा करत असलेला भारत डायनॅमिक्स बंद पडला. रेल्वे वॅगन आणि शकुंतलेच्या ब्रॉडगेजचा प्रश्न कायम आहे. असे असताना ते मला आणि पर्यायाने येथील जनतेला शिव्याशाप देत सुटल्याचा आरोप राणा यांनी केला.

- तर आमदारकीचा राजीनामा देईन
खासदारकीच्या आठ वर्षांच्या कालावधीत अमरावतीमध्ये केलेले एखादे मोठे काम अडसुळांनी दाखवावे, असे आव्हान रवी राणा यांनी दिले. काम दाखविल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असा दमही त्यांनी भरला. खासदारांच्या मुक्काम पोस्टबाबत अमरावतीकर मला विचारतात, अशी गुगलीही त्यांनी टाकली.

शिवसैनिकांचे खच्चीकरण
खा.आनंद अडसूळ यांनी संजय बंड, अनंत गुढे, सोमेश्वर पुसदकर आणि दिनेश बुबसारख्या निष्टावंत शिवसैनिकांचे खच्चीकरण चालविल्याचा आरोप राणा यांनी केला.अडसुळांनी काही शिवसैनिकांचा स्वार्थासाठी वापर सुरू केल्याची टीकाही त्यांनी केली. शिवसैनिकांनी आत्मसन्मान राखून आता अडसुळांना त्यांची जागा दाखवावी, अशी सूचना करीत भाजपवर पैसे देऊन निवडणूक जिंकण्याचा आरोप करणाऱ्या अडसुळांना कुणी रोखले होते का, असा सवाल राणा यांनी उपस्थित केला.

हिम्मत दाखवावीच
हिम्मत होती तर ते काल का पळून गेलेत ? आता ते कुठल्या क्षणाला काय करतात, हे मला पाहायचेच आहे. त्यांनी हिम्मत दाखवावीच, असे प्रतिआव्हान खा. आनंदराव अडसूळ यांनी दिले. खासदारकीच्या कार्यकाळात जिल्ह्यात केलेली विकासकामे अमरावतीकरांना ज्ञात आहेत. दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांच्या आरोपांना उत्तर देण्यास बांधिल नसल्याचे खा. अडसूळ म्हणाले.

Web Title: -Will teach a lesson to insomnia!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.