धावपट्टीवर वन्यप्राणी; अमरावतीमधील बेलोरा विमानतळावर विमाने उडणार कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 00:08 IST2024-03-29T00:07:16+5:302024-03-29T00:08:24+5:30
विमानतळाचा २०० एकर परिसरातून बाहेर काढण्याची कसरत : अपघाताची भीती

धावपट्टीवर वन्यप्राणी; अमरावतीमधील बेलोरा विमानतळावर विमाने उडणार कशी?
मनीष तसरे
अमरावती : बडनेरानजीक बेलोरा विमानतळाचे लवकरच विस्तारीकरण होणार असून, सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीची लांबी १३०० मीटरवरून १८०० मीटर केली जाणार आहे. जवळपास २०० एकरात विस्तारलेले हे विमानतळ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पूर्ण क्षमतेने सुरू होईल. या ठिकाणी एटीआर स्वरूपाची ७२ आसनी विमाने उतरणार आहेत. एवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सोयदेखील होणार आहे. दुसरीकडे या विस्तीर्ण परिसरात असलेल्या शेकडो वन्यप्राण्यांनी डोकेदुखी वाढविली आहे. त्यांना बाहेर न काढल्यास भविष्यात ते केव्हाही धावपट्टीवर येऊन अपघात घडवू शकतात, ही शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्राण्यांना बाहेर काढण्यासाठी वनविभागाला पत्रव्यवहार केला आहे.
बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच पूर्ण होऊन या ठिकाणाहून विमानसेवा सुरू होईल. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो वन्यप्राण्यांचा मुक्काम या ठिकाणी आहे. भूसंपादन केलेल्या जमिनीवर मुबलक चारा, पाणी असल्याने त्यांचा या ठिकाणी ठिय्या आहे. या पूर्ण परिसराला संरक्षण भिंत उभारल्याने या परिसरातून प्राणी बाहेर पडू शकत नाहीत.
---------------------------------------
वन्यप्राण्यांना बाहेर काढणे कठीण
जवळपास २०० एकर परिसरात हरिण, नीलगाय, रानडुक्कर, मोर यांसारखे शेकडो प्राणी परिसरात आहेत. या सर्व प्राण्यांना बाहेर काढणे हे वनविभागासमोर आव्हान आहे. शिकारी प्राणी नसल्याने या ठिकाणी असलेल्या प्राण्यांची संख्याही वाढतच आहे. याआधी एवढ्या मोठ्या संख्येने रेस्क्यू करण्याची वनविभागाला वेळच आली नाही. त्यामुळे नेमकी कुठली पद्धत वापरावी, याबाबत अजून वनविभागाने निर्णय घेतला नाही.
बेलोरा विमानतळावरील धावपट्टीवर वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या अपघाताची शक्यता पाहता, त्यांना बाहेर काढण्यासंबंधी पत्र आमच्या कार्यालयाला प्राप्त झाले असेल. माझ्याकडे नव्याने चार्ज आला आहे. ते पत्र मिळवून आम्ही त्यावर लवकरच निर्णय घेऊ.
- दिव्या भारती, उपवनसंरक्षक, वनविभाग