आग लागली तर विझवायची कुणी ?
By Admin | Updated: February 17, 2015 00:54 IST2015-02-17T00:54:55+5:302015-02-17T00:54:55+5:30
महानगरातील साडेआठ लाख लोकसंख्येच्या आपातकालीन, संकटाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिका अग्निशमन (फायर) विभागात मणुष्यबळाची वानवा आहे

आग लागली तर विझवायची कुणी ?
गणेश वासनिक ल्ल अमरावती
महानगरातील साडेआठ लाख लोकसंख्येच्या आपातकालीन, संकटाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिका अग्निशमन (फायर) विभागात मणुष्यबळाची वानवा आहे. यंत्रे आहेत पण संचालक नाहीत, अशी स्थिती असल्याने आग लागली तर विझवायची कुणी, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अग्निशमन दलात ७५ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता असून तोंडावरच असलेल्या उन्हाळ्यात ही समस्या जिवघेणीही ठरु शकेल. हल्ली ११ वाहने हाताळण्यासाठी साधारणत: १२६ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज असली तरी उपलब्ध मनुष्यबळ केवळ ३७ आहे.
अतिशय महत्त्वाची सेवा म्हणून अग्निशमन विभागाचा समावेश करण्यात आला आहे. या विभागात साहित्य सामग्री, वाहने, यंत्रे खरदी करण्यासाठी शासन विशेष अनुदान सुद्धा देते. मात्र, मागील काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने संकटकालीन परिस्थिती हाताळताना ‘फायर’ विभागाची दमझाक होते. महापालिका प्रशासनाचा आस्थापना खर्च ५६ टक्क्याच्या वर पोहचला आहे. नवीन भरतीला परवानगी देत नाही. परंतु या विभागाचा कारभार मणुष्याबळ अभावी कसा चालवावा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत सूर्य आग ओकू लागणार असून महानगर किंवा लगतच्या गावांमध्ये आग लागण्याचा घटना लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करताना मणुष्यबळाची कमतरता ही मुख्य समस्या ‘फायर’ मध्ये निर्माण झाली आहे. अति महत्त्वपूर्ण सेवेचा दर्जा असलेल्या अग्निशमन विभागात विशेष बाब म्हणून चालक, फायरमनही भरती प्रक्रिया राबवावी, असा प्रस्ताव फायर विभाग प्रमुख भारतसिंह चव्हाण यांनी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला आहे.