वाळू तस्करीचा मास्टरमाइंड कोण; मोर्शी, वरूड तहसीलदारांची चुप्पी का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:39 IST2025-10-20T17:37:25+5:302025-10-20T17:39:35+5:30
Amravati : कन्हान ते अमरावती कनेक्शन; पाच पोलिस ठाणे, तीन तहसील व आरटीओत पोहोचते बिदागी

Who is the mastermind of sand smuggling; Why are Morshi, Warud tehsildars silent?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अवैध वाळू व्यवसायाचे पायेमुळे खोलवर रूजली आहेत. मध्य प्रदेशातील कन्हान ते अमरावती असे वाळूतस्करीचे कनेक्शन आहे. मोर्शी, वरूड तहसीलदारांच्या आशीर्वादाने हा खेळ सुरू आहे. वाळू तस्करीचा मास्टरमाइंड 'सचिन' असून तो महसूल, पोलिस, आरटीओला बिदागी पोहोचवित असल्याने 'सब कुछ ओके' असा हा वाळूचा कारभार सुरू आहे. दरदिवशी कोट्यवधींची उलाढाल वाळू तस्करीतून होत असल्याचे वास्तव आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या निर्देशानुसार झिरो रॉयल्टी बंद करण्यात आली आहे. यामागे अवैध वाळू वाहतूक, वाळू तस्करीला लगाम लावणे हा प्रमुख उद्देश आहे. मात्र वरूडचे उपविभागीय अधिकारी 'तो मी नव्हे', अशी कृती करून वाळू तस्कर 'सचिन' याला पाठीशी घालत आहे. एसडीओ यांनीच अवैध वाळू तस्करीला हिरवी झेंडी दिली म्हणून वरूड आणि मोर्शी तहसीलदारांनी लक्ष्मी येता घरी तोच दसरा, दिवाळी असे म्हणत रात्रीतून वाळू वाहतुकीला मूक संमती देत तस्करांसाठी रान मोकळे केले आहे. यासंदर्भात वरूडचे एसडीओ प्रदीप पवार यांच्याशी सातत्याने संपर्क साधला त्यांनी प्रतिसाद दिला नाही, हे विशेष.
'ते थार' वाहन पोलिस आरटीओला दिसेना
वाळू तस्करी, रॉयल्टी वसुलीसाठी वापरले जात असलेले बीएच सिरीजचे काळ्या रंगाचे थार वाहन अद्यापही पोलिस, आरटीओला दिसून आले नाही. या वाहनाला कुणाचे अभय आहे, या विषयी चर्चा रंगत आहे.
दिवसा वाहनांची तपासणी हा केवळ देखावा
सीमावर्ती नाक्यावर दिवसा वाहनांची तपासणी केली जाते. प्रशासनाकडून या संदर्भात केवळ देखावा केला जातो. एवढेच नव्हे तर शालेय वाहनांची तपासणी करण्याची शक्कल लढविली जाते. मात्र, रात्रीतून वाळू तस्करी कुणाच्या आशीर्वादाने केली जाते, याबाबत जिल्हाधिकारी येरेकर यांनी शोधमोहीम राबविल्यास 'महसूलच्या दिव्याखाली अंधार असल्याचे दिसून येईल.
पाच पोलिस ठाणी, आरटीओ, तीन तहसीलदारांची बल्ले-बल्ले
मध्य प्रदेशातील कन्हान वाळू घाटातून वाहन बाहेर पडल्यानंतर पांढुर्णा पोलिसांना बिदागी दिल्यानंतर अमरावतीच्या दिशेने वाळू तस्करीचा प्रवास सुरू होतो. शेंदुरजना घाट, बेनोडा शहीद, मोर्शी, नेर लेहगाव, नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू तस्करीचे वाहन पोलिस आयुक्तालयाच्या सीमेत राजरोसपणे आणले जाते.
झिरो रॉयल्टी बंद असताना वाळूची वाहने रस्त्यावर कशी?
प्रशासनाने झिरो रॉयल्टी बंद केली असताना अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी दरदिवशी शेकडो वाहने रस्त्यावर धावत आहेत. घाटातून आणली जाणारी ही नियमबाह्य असून पोलिस, आरटीओ, महसूलचे अभय आहे. वाळू वाहतूकदारांकडून थार वाहनातून 'सचिन' हाच वसुली करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे आरटीओ, एलसीबीच्या फिरत्या पथकावरही 'सचिन'चे साम्राज्य सर्वश्रुत आहे.