९० लाख रूपयांची अंडी कुणी खाल्ली? धारणी एकात्मिक प्रकल्पातून देयकांची फाईलच केली गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:42 IST2025-11-10T13:41:26+5:302025-11-10T13:42:48+5:30
Amravati : तक्रारीनंतरही आरोपी सापडेना; लेखापाल आणि भांडारपाल यांच्यावर संशय

Who ate the eggs worth Rs 90 lakh? The payment file disappeared from the Dharani Integrated Project
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या धारणी येथील एकात्मिक प्रकल्प कार्यालयातून अंडी पुरवठा न करता ९० लाखांची देयके काढण्यात आली. मात्र, हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच आधी ही फाईल गायब केली गेली आणि नंतर गॅस कटरने खिडकी कापून कपाटातून ती फाइल गायब झाल्याचा बनाव करण्यात आला. ही घटना ३ जून २०२४ रोजी घडली होती. याप्रकरणी धारणी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली असली तरी अद्यापही यातील आरोपी सापडले नाही.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना, वसतिगृह, आश्रमशाळा व शिक्षण क्षेत्रावर नियंत्रणाची जबाबदारी असलेले धारणी 'पीओ' कार्यालय अपहार प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांमुळे सतत वादग्रस्त राहिले आहे. गतवर्षी धारणी अंतर्गत आश्रमशाळांना अंडी व केळी पुरवठा प्रकरणात फाईल गायब झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.
घटनेला अठरा महिने उलटून गेले तरी ना ती फाइल सापडली, ना पुरवठादाराचा माग लागला. याप्रकरणी तत्कालीन लेखापाल आणि भांडारपाल यांनी अंडी पुरवठादाराशी संगनमत करून ९० लाखांचे देयके काढून तत्कालीन प्रकल्प अधिकारी रिचर्ड अँथन यांना अंधारात ठेवून संबंधितांनी फाईलवर स्वाक्षरी घेतली.
याप्रकरणी अनेक अधिकारी, कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात येणार असून 'तेरी भी चूप मेरी भी चूप' असा धारणी पीओ कार्यालयाचा कारभार सुरू आहे. ९० लाख रुपये अंडी पुरवठ्याचे चाळीसगाव येथील श्री स्वामी समर्थ सप्लायर या नावाने देयके काढली आहेत. यात पोलिस तपास थंडावल्याने संशय अधिक बळावला आहे.
अगोदर अंडी नंतर केळी पुरवठ्याची फाईल गायब
- धारणी प्रकल्प कार्यालयातून २०२४ मध्ये आधी अंडी आणि नंतर केळी पुरवठ्याची फाइल गायब झाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे माहिती अधिकारात अंडी पुरवठ्याची कागदपत्रे मागितली असता याप्रकरणी अनेकांच्या मागे ससेमिरा लागू शकतो. त्यामुळे कपाटातून फाइल गायब झाल्याचे चित्र रंगविले. त्याकरिता गॅस कटरचा वापर केला.
- हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. २ खोट्या पावतीच्या आधारे २० २० लाखाचयक लाखांचे देयके काढले, पोलिसांत तक्रार होताच पुन्हा 'बॅकडेट'मध्ये नवीन फाइल असल्याचा देखावा करण्यात आला. केळी पुरवठ्याचे २० लाख रुपये देयकांची फाईल सुद्धा गायब झाल्याचे बोलले जात आहे.
"अंडी पुरवठा देयकांचे प्रकरण मागील वर्षीचे आहे. फाईल चोरीस गेल्याची तक्रार कार्यालयाने पोलिसांत नोंदविली असून, तपास सुरू आहे. यात विभागीय चौकशी देखील झाली आहे. नेमके पुढे काय झाले, याबाबत अहवाल प्राप्त झाला नाही. मात्र सोमवार, १० नोव्हेंबर रोजी याप्रकरणाचा मागोवा घेण्यात येईल."
- आयएएस सिद्धार्थ शुक्ला, प्रकल्प अधिकारी, धारणी