कुठे मुरते १० लाख लिटर पाणी?
By Admin | Updated: January 4, 2017 00:25 IST2017-01-04T00:25:33+5:302017-01-04T00:25:33+5:30
ज्या नांदगाव शहरवासीयांनी पाण्यासाठी प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसल्या वेळप्रसंगी पाण्यासाठी गोळीबारही झाला,

कुठे मुरते १० लाख लिटर पाणी?
नांदगावला ६ लाख लिटरची गरज : वितरण मात्र १६ लाख लिटर
मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वर
ज्या नांदगाव शहरवासीयांनी पाण्यासाठी प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसल्या वेळप्रसंगी पाण्यासाठी गोळीबारही झाला, त्या शहरात सद्यस्थितीत मात्र पाण्याचा शहरातील काही भागात प्रचंड अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.
नांदगाव शहराला दैनंदिन ६ लाख लीटर पाण्याची गरज असताना वितरण मात्र १६ लाख लीटर पाण्याचे होत आहे. नेमके १० लाख लीटर पाणी कुठे मुरतेय, हा या नगरपंचायतीसाठी संशोधनाचा विषय बनला आहे. नगरपंचायतीने अधिक वेळ न घालविता पाण्याच्या अपव्ययाला आळा घालणे गरजेचे आहे.
नांदगाव शहराची लोकसंख्या १५ हजार असून प्रतिव्यक्ती ४० लीटर पाणी याप्रमाणे शहराकरिता ६ लाख लीटर पाण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत शहराकरिता चांदी धरण हा पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. त्याचप्रमाणे मोखड विहीर, इखार विहीर, इंदिरा आवास बोअर, खासदार बोअर असे पाण्याचे स्त्रोत आहेत. वर्षानुवर्षांपासून शहराला उन्हाळ्याच्या दिवसांत दुष्काळाच्या प्रत्येक झळा सोसाव्या लागतात. परंतु चांदी धरणावरून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर नागरिकांना भरपूर पाणी मिळेल व दुष्काळजन्य स्थितीतून कायमची सुटका होईल, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु पाण्याच्या नियोजनचा अभाव व प्रचंड प्रमाणात असलेले अवैध कनेक्शन पाणी पुरवठ्याची खरी डोकेदुखी ठरली आहे. सद्यस्थितीत शहरात २ हजार वैध कनेक्शन असल्याची माहिती आहे, तर हजारांच्यावर अवैध कनेक्शन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच अनेक ठिकाणी २ ते ३ कनेक्शन आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात पाणी प्रचंड प्रमाणात वाया जाते. काही भागात मात्र अद्यापही तीन दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे जर १६ लाख लीटर पाणी दैनंदिन वितरित होते, तर मग पाणी मुरतेय कुठे, याकडे नगरपंचायतीने जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
शहरामध्ये एकूण १७ वॉर्ड आहेत. त्या प्रत्येक वॉर्डात किती कनेक्शन दिल्या गेले याची सविस्तर शहानिशा नगरपंचायतीने केल्यास त्यातून एक हजारांच्यावर अवैध कनेक्शनचा आकडा बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तसेच प्रत्येक वॉर्डात पाण्याचे नियोजन करताना प्रत्येकाला पाणी मिळते की नाही याची शहानिशा करावी व सार्वजनिक स्टँडपोजवर तोट्या बसविणे गरजेचे कारण त्याद्वारे प्रचंड प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत वेळीच लक्ष देऊन जर पाण्याच्या अपव्ययाला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, तर शहरातील काही भागात कायमचा दुष्काळ राहील व उन्हाळ्यात पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी मरणयातना सोसाव्या लागेल, एवढे मात्र निश्चित.
अतिरिक्त पाण्याचा शोध घेऊ
पाण्याचा अपव्यय कशाप्रकारे होत आहे, याची कारणमीमांसा शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येईल. नांदगाव शहराला प्रतिव्यक्ती ४० लीटर याप्रमाणे ६ लाख लीटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु अतिरिक्त पाणी कुठे जाते याचा शोध घेऊ, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी नीलेश जाधव यांनी दिली.
पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करू
पाण्यासाठी शहरवासीयांनी प्रचंड यातना सोसल्या आहेत. त्यामुळे आता तरी प्रत्येकाला पाणी मिळावे, यासाठी अवैध कनेक्शनधारकांवर कारवाई करून शहरवासीयांना पुरेपूर पाणी देण्यासाठी नियोजन करू, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त पाणीपुरवठा सभापती फिरोज खान यांनी दिली.