लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत येणाऱ्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांचा गुंता गेल्या अनेक वर्षापासून सुटलेला नाही. या रुग्णालयात क्लासवन डॉक्टरांची ४६ पदे मंजूर असून त्यातील २२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्यसेवा कशी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय, जिल्हा स्त्री व बाल रुग्णालय जिल्ह्यात आहेत. या रुग्णालयांमध्ये सर्वच प्रकारची आरोग्यसेवा ही मोफत मिळत असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांसाठी हे रुग्णालय आधार आहेत. परंतु या रुग्णालयात आरोग्यसेवा देणारे डॉक्टर्स तसेच इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा कशी मिळणार असा प्रश्न कायम आहे.
आरोग्यमंत्री लक्ष देणार का?सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर दोन दिवसांच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते मेळघाटातील रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन सोमवारी सायंकाळी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात आरोग्य विभागाचा आढावा घेणार आहेत. या आढावा बैठकीत ते रिक्त पदांचा गुंता सोडविणार का असा प्रश्न आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित करत आहेत.
१४७ पदे रिक्तजिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात वर्ग एक ते चारपर्यंत एकूण १४२८ पदे मंजूर आहे. त्यातील ३०८ पदे हे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. जिल्हा रुग्णालयात ५८७ पदे मंजूर असून येथे सर्वाधिक १४७ पदे रिक्त असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्हा रुग्णालयात १२ क्लासवन डॉक्टर्स नाहीतजिल्हा रुग्णालयात क्लासवन डॉक्टरांची २२ पदे मंजूर असून यातील बारा पदे रिक्त आहेत. तर जिल्हा स्त्री रुग्णालयात ५ पैकी १ पद रिक्त, अचलपूर महिला व बाल रुग्णालयात ५ मंजूर पदांपैकी ४ रिक्त आहेत. त्याचबरोबर दर्यापूर व चांदूर बाजार उपजिल्हा रुग्णालय, अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा ग्रामीण रुग्णालय, भातकुली ग्रामीण रुग्णालय येथे एकच क्लासवन डॉक्टरांचे पद मंजूर असून ते देखील रिक्त असल्याची माहिती आहे.