गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लाडकी बहीण, नमो किसान महासन्मान आदी योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर ताण पडला आहे. त्यातच आता कर्जमाफी होणार, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये असल्याने पीककर्जाची वसुली बाधित झालेली आहे. शेतकरी थकबाकीदार झाल्यास त्यामुळे जिल्हा बँकेसह काही बँकांची आर्थिक कोंडी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे कर्जमाफी होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांद्वारा पीक कर्जाचा भरणा होत नाही. अशा परिस्थितीत कर्जवसुली थबकली आहे. मुदतीत कर्जाचा भरणा न केल्यास शेतकरी थकबाकीदार होणार व त्यांना पुढील वर्षी कर्ज मिळणार नाही. शिवाय बँकांचा आर्थिक ताण वाढणार आहे.
यापूर्वी युती सरकारने दीड लाखांपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यानंतर महाआघाडी सरकारने दोन लाखांपर्यंत थकीत कर्ज माफ केले. शिवाय नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ४० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिलेले आहे. त्यामुळे बँकांची वसुली होऊन आर्थिक स्थिती सुधार आलेला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा कर्जमाफीची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे बँकांची वसुली अडचणीत आलेली असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे.
निवडणुकीत आश्वासनविधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफीची घोषणा केली, असे शेतकरी सांगतात. प्रत्यक्षात शासनस्तरावर याबाबत कोणत्याही हालचाली सुरु नसल्याने सध्या कर्जमाफीचा विषय जटील झाला आहे.
व्याजमाफीला मुकल्यास आर्थिक भुर्दंड बसणारसध्या कर्जमाफीची शक्यता नसल्याचे बँकांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तीन तीन लाखांपर्यंत कर्जाचा भरणा शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत केल्यास त्यांना व्याजमाफीचा फायदा मिळू शकतो. मात्र थकबाकीदार झाल्यास त्यांच्या कर्जावर ३१ मार्चनंतर ९ टक्क्यांपर्यंत व्याजाची आकारणी होईल.
खरिपात उच्चांकी १,४६४ कोटींचे पीककर्ज वाटपजिल्ह्यातील बँकांना खरीप २०२४ हंगामासाठी १,६०० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक होते. त्या तुलनेत १,११,४७५ शेतकऱ्यांना १४६४.१२ कोटींचे पीक कर्जवाटप केले ही २२ टक्केवारी आहे. सलग दोन वर्षी बँकांनी उच्चांकी कर्जवाटप केले आहे
वसुली पथके खालीहात..फेब्रुवारीपासूनच बँकांद्वारे कर्जवसुली सुरु होते. त्यानूसार बँकांची पथके वसुलीस ज जातात. मात्र रिकाम्या हाताने परत येत असल्याचे वास्तव आहे.
६०० सोसायट्या येणार आर्थिक अडचणीतजिल्हा बँकेची थकबाकी (३१ जानेवारीअखेर/लाखात)अल्पमुदती पीक कर्ज - १२०४७६.७७मध्यममुदती शेती कर्ज - १८६१८.५१दीर्घमुदती शेती कर्ज - १८.१२एकूण शेती कर्ज - १३९११४.२०एकूण थकबाकी - १३९११४.२०थकबाकीचे प्रमाण - १०० टक्के
"शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत पीक कर्जाचा भरणा करून व्याजमाफी योजनेचा लाभ घ्यावा. जिल्हा बँकेद्वारा ४ एप्रिलपासून पुन्हा पीक कर्ज वाटप सुरू होणार आहे. त्यामध्ये नव्याने पीक कर्ज मिळू शकते."- अभिजित ढेपे, उपाध्यक्ष, जिल्हा बँक