जिमीसाठी व्हील चेअरचे ‘जुगाड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:57 IST2018-07-07T21:57:16+5:302018-07-07T21:57:45+5:30
मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे मागील पायाने अधू झालेल्या श्वानाला ‘वसा’ संस्थेने ‘जुगाड’ वापरून उभे केले. पुन्हा धावते केले. दोन महिन्यांच्या प्रेमळ सहवासानंतर या ‘जिमी’ने जगाचा निरोप घेतला.

जिमीसाठी व्हील चेअरचे ‘जुगाड’
वैभव बाबरेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे मागील पायाने अधू झालेल्या श्वानाला ‘वसा’ संस्थेने ‘जुगाड’ वापरून उभे केले. पुन्हा धावते केले. दोन महिन्यांच्या प्रेमळ सहवासानंतर या ‘जिमी’ने जगाचा निरोप घेतला.
भटक्या कुत्र्यांच्या संगोपनासाठी तत्पर वसाच्या रेस्क्यू हेल्पलाइनला अतुल पाटणकर यांनी २ मार्च रोजी मादी पिल्लाला अपघात झाल्याचे कळविले. शुभम सायंके, गणेश अकर्ते आणि निखिल फुटाणे यांनी पुंडलिकबाबा नगरातून छाया कावरे यांच्या मदतीने पिल्लाला घेऊन पशू सर्वचिकित्सालयात आणले. डॉ. अनिल कळमकर यांनी तपासणी केली. अपघातात एकाएकी अनावश्यक भर पाठीवर पडल्यामुळे या श्वानाच्या आतड्याचा शेवटचा भाग गुदद्वाराद्वारे बाहेर आला होता. मणक्याच्या दुखापतीमुळे मागील दोन्ही पायांना अपंगत्व आल्याने बाहेर आलेला आतड्याचे टोक जमिनीला घासून त्यातून सतत रक्तस्राव होत होता. पिल्लावर शस्त्रक्रिया होऊ शकत नसल्याने त्याला उत्तमसरा येथील वसाच्या रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.
वसाची भूतदया
जिमीला लघवी आणि शौच स्वत:हून करता येत नव्हती. वसाचे शुभम सायंके गुदद्वारात बोट टाकून पिल्लाची विष्ठा बाहेर काढायचे. शौचाची जागा धुवून द्यायचे. या कामात त्यांचे बंधू भूषण सायंके व मुकेश मालवे मदत करायचे.
जिमी झाली होती पायावर उभी
जिमी तिच्या पायावर उभी राहू शकणार नाही, हे पक्के झाल्यावर शुभम सायंके यांनी व्हील चेअरची कल्पना विचारात घेतली. ३२० रुपयांत प्लास्टिक पाइपची व्हील चेअर वडिलांची मदत घेत त्यांनी तयार केली. पहिल्यांदा जिम्मी व्हील चेअरसकट जमिनीवर कोसळली. सरावानंतर ती हळूहळू चालू लागली आणि आठवड्याभरात व्हील चेअरसह सेंटरमध्ये बागळू लागली. रस्त्यावरून धावू लागली. विदर्भात अपंग श्वानासाठी ही कदाचित पहिली व्हील चेअर असेल.
‘आॅनलाईन’ मदत
काही आठवड्यानंतर जिम्मीची पोस्ट वसाने फेसबूकवर टाकली असता, डोंबिवली, मुंबई येथील प्राणिप्रेमी प्रतिमा दातार यांनी जिम्मीच्या पाठीच्या मसाजसाठी आयुर्वेदिक तेल पाठविले. अमरावती येथील भूषण वानखडे आणि रूपाली वानखडे यांनी जिम्मीच्या जेवणाची जबाबदारी घेतली.