चार दिवस उटण्याच्या सुगंधात दरवळणार
By Admin | Updated: November 10, 2015 00:35 IST2015-11-10T00:35:34+5:302015-11-10T00:35:34+5:30
धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा व भाऊबीज या चार सांस्कृतिक विचारधारेशी दिवाळी हा सण जोडला आहे.

चार दिवस उटण्याच्या सुगंधात दरवळणार
उत्सव : आज नरक चतुर्दशी, उद्या दिवाळी
सुमित हरकुट चांदूरबाजार
धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा व भाऊबीज या चार सांस्कृतिक विचारधारेशी दिवाळी हा सण जोडला आहे. भारतीय संस्कृतीत दिवाळी या सणाला अधिक महत्त्व असले तरी मातीची पणती, अभ्यंगस्रान व उटण्याने चार दिवस सुगंध दरवळतो.
मानवी शरीर पंचतत्त्वापासून बनले आहे. माती ही पंचतत्त्वापैकी एक आहे. त्यामुळे मातीच्याच दिव्याचे महत्त्व दिवाळीला आहेत. दिवा म्हणजे ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक असून शास्त्रानुसार पुण्यकाळात धनसंपत्तीची देवी लक्ष्मी भ्रमणासाठी बाहेर पडली असताना ज्या घरात कलह, दारिद्र्य, रोग व आर्थिक चणचण आहे, परंतु त्या घरात मातीचा दिवा असेल तर त्या घरात लक्ष्मी विराजमान होते, अशी आख्यायिका आहे. धनत्रयोदशीपासून घरासमोर दिवे लावण्याची परंपरा आहे, दिव्यामुळे वास्तुदोष दूर होतो तर वातावरणातील नकारात्मक उर्जा नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा दरवळते.
दिवाळीच्या चार दिवसांत अभ्यंगस्रानाला महत्त्व आहे. दैनंदिन जीवनात त्वचेवर ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम होतो. प्रत्येक क्षणी त्वचा ही निसर्गाशी जुळवून घेत असते. दिवाळीच्या काळात थंडीला सुरुवात होते.
निसर्गात चंद्राचा प्रभाव वाढतो. सूर्य दक्षिणायनात जातो, हवेत शीतलता व शरीर आतून उष्णता या दोन्ही घटनांमुळे त्वचा फाटते. त्यामुळे तिळाच्या तेलाने अंग चोळून स्रान करणे म्हणजे अभ्यंगस्रान होय. त्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होते.
आयुर्वेदशास्त्रानुसार उटण्याला अधिक महत्त्व आहे. घरगुती स्वरुपात उटणे म्हणजे हळद, आंबेहळद, दुधाची साय, मंजीरा, आवळा आदीचे मिश्रण केल्यास उटणे तयार होऊ शकते. सध्या उटणे केवळ दीपावली अभ्यंगस्रानापुरता महत्त्वाचा मानतात.