त्रिपुरातील कथित घटनेचे अमरावतीत पडसाद, मोर्चाला हिंसक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 07:44 PM2021-11-12T19:44:21+5:302021-11-12T19:45:27+5:30

Amravati News त्रिपुरातील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अमरावती शहरात काढलेल्या मोर्चाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले.

Violent turn of events in Amravati against the backdrop of Tripura incident | त्रिपुरातील कथित घटनेचे अमरावतीत पडसाद, मोर्चाला हिंसक वळण

त्रिपुरातील कथित घटनेचे अमरावतीत पडसाद, मोर्चाला हिंसक वळण

Next
ठळक मुद्देसंकुलावर दगडफेक दुकानांची तोडफोड

अमरावती : त्रिपुरातील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अमरावती शहरात काढलेल्या मोर्चाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. सुमारे ३० ते ४० हजारांच्या जमावाने जयस्तंभ चौक, मालविय चाैक, जुना कॉटन मार्केट रोड, इर्विन चौक, चित्रा चौक व प्रभात चौकातील प्रतिष्ठान व मॉलला लक्ष्य केले. त्यादरम्यान अनेक ठिकाणी तुफानी दगडफेक करण्यात आली. हा सर्व घटनाक्रम अनपेक्षितपणे घडून आल्याने पोलिसांचीदेखील तारांबळ उडाली. दरम्यान, घटनेच्या अनुषंगाने शहर कोतवाली पोलिसांनी सात तक्रारी नोंदवून घेत शेकडो आंदोलकांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास ३० ते ४० हजार मुस्लिम बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तत्पूर्वी त्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून त्रिपुराच्या घटनेचा निषेध केला. दुपारी ४ च्या सुमारास आंदोलकांनी जुन्या कॉटन मार्केट चौकातील काही दुकाने जबरीने बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करताच मोठा तणाव निर्माण झाला. त्यानंतर त्याच परिसरातील माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्या किराणा प्रतिष्ठानावर दगडफेक करण्यात आली. दुसरीकडे जुन्या वसंत टॉकीज परिसरातील मेडिकल पॉइंट, फुडझोन, लढ्ढा इंटेरियर, जयभोले दाभेली सेंटर, राजदूत डेअरी, शुभम इलेक्ट्रिकची तोडफोड करण्यात आली. यात शिवा गुप्ता व विशाल तिवारी हे दोन व्यावसायिक जखमीदेखील झाले. इर्विनचौक स्थित आयकॉन मॉल व माजी पालकमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे यांच्या कॅम्प स्थित कार्यालयावरदेखील दगडफेक करण्यात आली.

त्यानंतर ते आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तेथे पोलिसांशी त्यांची झटापट देखील झाली. या घटनेनंतर पोलीस मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. दुसरीकडे भाजपने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. रस्त्यावर आंदोलक नव्हते, तर गुन्हेगार उतरले होते. त्याची पोलिसांना अजिबात कल्पना नव्हती, त्यामुळे हिंदू धर्मियांच्या दुकानांना ठरवून ‘टार्गेट‘ करण्यात आल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी व भाजपचे महापालिकेतील गटनेता तुषार भारतीय यांनी केला. आंदोलकांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. आंदोलकांनी परतताना चित्रा चौक येथे एका मॉलवर दगडफेक केली.

Web Title: Violent turn of events in Amravati against the backdrop of Tripura incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.