ठाणेदाराने आवळल्या गावनेत्यांच्या मुसक्या !
By Admin | Updated: March 17, 2016 00:15 IST2016-03-17T00:15:36+5:302016-03-17T00:15:36+5:30
प्रहार पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखाला पोलिसांनी अटक केल्यानंतर पालिकेच्या एका अपक्ष नगरसेवकासह त्याच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला.

ठाणेदाराने आवळल्या गावनेत्यांच्या मुसक्या !
जामीन मंजूर : नगरसेवकांसह १८ जणांना अटक
अंजनगाव सुर्जी : प्रहार पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखाला पोलिसांनी अटक केल्यानंतर पालिकेच्या एका अपक्ष नगरसेवकासह त्याच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. पोलिसांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. त्यामुळे ृनगरसेवकासह १८ जणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली होेती. बुधवारी अंजनगाव येथील न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.
विस्तृत माहितीनुसार, प्रहार पक्षाचे उपजिल्हा प्रमुख शंभू मालठाणे यांनी काही दिवसांपूर्वी अंजनगाव पालिकेत कचराफेक आंदोलन केले होते. त्यावेळी पालिका मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याविरूध्द पोलीस तक्रार केली होती. त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान याच प्रकरणी अंजनगाव पोलिसांनी शंभू मालठाणे यांना अटक केली. त्यांच्या सुटकेसाठी अपक्ष नगरसेवक शंकर मालठाणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी दुपारी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान धुमाकूळ घालून पोलिसांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावरून अंजनगाव पोलीस स्टेशनमध्ये रात्री १० वाजता स्टेशन डायरी अंमलदार अनिल वानखडे यांनी उपरोक्त नगरसेवक व त्यांच्या साथीदारांविरूध्द तक्रार नोंदविली. त्यामुळे शंकर मालठाणेंसह १५ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये शंकर मालठाणे, प्रफुल वाठ, आशिष सरोदे, अतुल सरोदे, मुन्ना मालठाणे, संजय चव्हाण, मनोज जवादे, राहुल धानोरकर, शिवम ढोले, श्रीकांत नायटकर, विनोद तेलगोटे, आनंद जवादे, संजय हिरे, निरंजन गावंडे, परवेज अहमद मो. इस्त्राल, रविंद्र अभ्यंकरसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ३५३, २९४, ५०६, १४३, १३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राजकीय हस्तेक्षपाला घातला आवर
पोलीस खात्यात कर्तृत्वानेच वलय प्राप्त होते. परंतु तसे कौशल्य, कसब सर्वांकडेच असते असे नाही. अंजनगाव पोलीस ठाण्यात ठाणेदार म्हणून रुजू झालेले संजय लोहकरे यांनी पदभार स्वीकारताच वचक निर्माण केला आहे. पद आणि प्रतिष्ठेचा दबाव आणून दादागिरी करणाऱ्यांसह राजकीय नेत्यांचा पोलीस ठाण्यातील हस्तक्षेप त्यांनी बंद केला आहे. ठरवून काम करणारे संजय लोहकरे हे कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची त्यांची निर्भिड कार्यशैली आहे. बीड जिल्ह्यातून ते अंजनगाव ठाण्यात रुजू झालेत. त्यांनी येथील अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली काढली आहेत. वारंवार समन्स बजावल्यानंतरही न्यायालयात हजर न होणाऱ्यांविरूध्द त्यांनी आता अटकसत्र सुरू केले आहे.