'या' गावात सरणावरील मृतदेहावर धरावी लागते ताडपत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 14:24 IST2020-07-08T14:24:19+5:302020-07-08T14:24:46+5:30
अमरावती जिल्ह्यातील कांडगी गावात सरणावरील मृतदेह पावसाने ओला होऊ नये म्हणून नातेवाइकांना त्यावर चक्क ताडपत्री धरावी लागत आहे.

'या' गावात सरणावरील मृतदेहावर धरावी लागते ताडपत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुळ्या शहरांचा विस्तार ज्या भागात होत आहे, त्या कांडली ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीची दुरवस्था पावसाळ्यात उघड झाली आहे. कांडगी गावात सरणावरील मृतदेह पावसाने ओला होऊ नये म्हणून नातेवाइकांना त्यावर चक्क ताडपत्री धरावी लागत आहे.
कांडली स्मशानभूमीतील दुरवस्था लक्षवेधक ठरत आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कारांसाठी बांधलेल्या सिमेंट ओट्यावरील टीन गायब आहेत. एक-दोन टीन त्यावर दिसत असले तरी पावसाच्या पाण्यापासून ते टीन मृतदेहाचा, चितेचा बचाव करू शकत नाहीत. प्रेत जळत असताना मध्येच आलेल्या पावसाने ते सरण विझण्याच्या, ओलेचिंब होत राख इतरत्र पसरण्याच्या प्रसंगालाही सामोरे जावे लागत आहे.
तीन दिवसांपूर्वी सरणावरील मृतदेह ओला होऊ नये याकरिता त्यावर ताडपत्री धरण्याचा प्रसंग आप्तांवर गुदरला. या घटनेने संतप्त होऊन प्रथमेश ठाकरे, प्रीतेश अवघड, जयराज घोरे, अमन भंडारी, तुषार तोंडगावकरसह आदींनी कांडलीच्या ग्रामसचिवांना निवेदन दिले. यात टिनशेडच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमीतील आवश्यक कामे करण्याकरिता प्रस्ताव पाठविण्यात येतील. किरकोळ दुरुस्ती असल्यास ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातून ते काम करू. नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवू.
- एम.एस. कासदेकर
प्रशासक, कांडली ग्रामपंचायत
२०१४ मध्ये तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून हे टीनशेड टाकले गेले. तत्त्कालीन आमदार केवलराम काळे यांच्या निधीतून स्मशानभूमीला आवारभिंत आणि सभागृह बांधण्यात आले. मात्र, २०१४ नंतर कुणीही लक्ष दिले नाही.
-ओमश्री घोरे
माजी सभापती, पंचायत समिती