लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रारंभी शहरी भागात हातपाय पसरणाऱ्या कोरोना संसर्गाने आता ग्रामीण भागाला विळख्यात घेतले आहे. जिल्ह्यातील १४पैकी अनेक तालुक्यांमध्ये शहरीपेक्षा ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळत आहेत. आरोग्य विभागाकडून ‘झिरो डेथ मिशन’ बरोबरच ॲन्टिजेन चाचणीही केली जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यापासून शहराच्या बरोबरीनेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. गतवर्षी पहिल्या लाटेत शहरी भागातच मोठ्या संख्येने रुग्ण होते. यावेळी मात्र अगदी वाडी, वस्ती, तांड्यावरही रुग्ण आढळत आहेत. दिनांक १ ते २५ एप्रिल या कालावधीत ग्रामीण भागातील १४ तालुक्यांमध्ये ७ हजार ५९२ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. यापैकी आजघडीला ४,०४८ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, तर याच कालावधीत १२८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. संसर्ग उद्भवणाऱ्या गावांमध्ये ॲन्टिजेन चाचणी शिबिर घेण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी कोरोनाची रुग्णसंख्या गत महिनाभरापासून शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.
बॉक्स
गप्पांचे फड
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावांमध्ये लोक एकत्र बसून गप्पांचा फड रंगवत आहेत. कुठे मनोरंजनपर खेळ सुरू आहेत. असे एकत्र आल्याने संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असून, शहरासोबतच ग्रामीण भागातही संचारबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे.
बॉक्स
तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्णसंख्या
वरूड ७६८, धारणी ४०६, मोर्शी ३६२, अचलपूर ३५७, चांदूर रेल्वे २९४, धामणगाव रेल्वे २७१, चिखलदरा २४८, अंजनगाव सुर्जी २४६, तिवसा २३४, चांदूर बाजार २३२, दर्यापूर २२१, नांदगाव खंडेश्वर १६७, अमरावती १२८, भातकुली ९६ अशी तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्णसंख्येची नोंद २५ एप्रिलच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालात झाली आहे.