वऱ्हाडातील ४६ तालुक्यात पावसाची तूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 18:01 IST2018-09-29T17:59:06+5:302018-09-29T18:01:12+5:30
शासन स्तरावर यंदाचा पावसाळा ३० सप्टेंबरला संपत आहे. सोमवारपासून पावसाच्या रोजच्या नोंदी घेणे बंद होणार असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षही सुस्तावणार आहे.

वऱ्हाडातील ४६ तालुक्यात पावसाची तूट
अमरावती - शासन स्तरावर यंदाचा पावसाळा ३० सप्टेंबरला संपत आहे. सोमवारपासून पावसाच्या रोजच्या नोंदी घेणे बंद होणार असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षही सुस्तावणार आहे. पश्चिम विदर्भात पावसाच्या या १२० दिवसांत ८६ टक्क्यांची तूट आहे. सरासरीपेक्षा ११५ मिमी पाऊस कमी पडला. अकोला व वाशिम वगळता उर्वरित तीन जिल्ह्यांतील ४६ तालुके पावसात माघारले आहेत. त्यामुळे भूजलातही मोठ्या प्रमाणात कमी असल्याने आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.
विदर्भात जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत पावसाचे १२० दिवस गृहीत धरण्यात येतात. यानंतर बरसणाऱ्या पावसाची अवकाळी नोंद होते. शासनाच्या योजना व सवलती व तसेच पाऊस कमी असल्यास उपाययोजना या चार महिन्याच्या आकडेवारीवरच आधारीत असतात. तसेच या चार महिन्यात प्रत्येक तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सुरू असतो. या कालावधीत पावसाची मंडलनिहाय नोंद घेण्यात येते. मात्र, ३० सप्टेंबरनंतर फक्त अवकाळी पाऊस आल्यासच नोंद घेण्यात येते.
पश्चिम विदर्भात या कालावधीत ७७८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. ही ८६ टक्केवारी आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात १००.६ व वाशिम जिल्ह्यात १००.८ मिमी पावासाची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात ८१४ मिमी पाऊस अपेक्षित असतांना ६३३ मिमी, यवतमाळ जिल्ह्यात ९११ मिमी अपेक्षित असताना ७१२ मिमी, तर बुलडाणा जिल्ह्यात ६६७ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४६६ मिमी पाऊस पडला. विभागातील अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर, अकोला जिल्ह्यात अकोला, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर यवतमाळ जिल्ह्यात आर्णी व पुसद, वाशिम जिल्ह्यात मालेगाव, मंगरूळ पीर व कारंजा या नऊ तालुक्यातच पावसाने सरासरी गाठली आहे उर्वरित ४६ तालुके पावसाच्या सरासरीत माघारल्याने येत्या रबी हंगामावरही दुष्काळाचे सावट आहे.
प्रकल्प तहानले, रबी धोक्यात
विभागात अपुऱ्या पावसाअभावी नऊ मध्यम प्रकल्पात अत्यल्प साठा आहे यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात नळगंगा १८ टक्के, पेनटाकळी १९, पलढग ३१.३२, मस २.५३, कोराटी ८.९३, मन २५.६६, तोरणा १४ तर उतावळी प्रकल्पात ३९ मिमी जलसाठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत २४ मध्यम प्रकल्पात सरासरीच्या ७१ टक्के तर ४६६ लघुप्रकल्पात ६३.७३ टक्के साठा शिल्लक आहे. कमी पावसामुळे जमिनीतही आर्द्रता कमी असल्याने यंदाच्या रबीवर थेट असर होणार आहे. एकंदरीत यंदा वेळीच उपाययोजना न केल्यास पिण्याच्या पाण्याची बकट समस्या निर्माण होऊ शकते.