‘त्या’ दारु विक्रीच्या दुकानाची होणार पडताळणी
By Admin | Updated: April 26, 2015 23:55 IST2015-04-26T23:55:36+5:302015-04-26T23:55:36+5:30
येथील भाजीबाजार परिसरातील देशी दारुविक्रीच्या दुकानाबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने २८ एप्रिल रोजी पडताळणी केली जाणार आहे.

‘त्या’ दारु विक्रीच्या दुकानाची होणार पडताळणी
निर्णय : मंगळवारी चमू दाखल होणार
अमरावती : येथील भाजीबाजार परिसरातील देशी दारुविक्रीच्या दुकानाबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने २८ एप्रिल रोजी पडताळणी केली जाणार आहे. वस्तुस्थिती जाणून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. त्यामुळे दारुबंदीची मागणी करणाऱ्या महिलांच्या लढ्याचे हे पहिले यश मानले जात आहे.
नागरिक कृती समितीने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सादर करुन देशी दारु विक्रीचे दुकान हद्दपार करण्याची मागणी केली होती. महिला आक्रमक झाल्या होत्या. या दुकानामुळे भाजीबाजार परिसरात सामाजिक स्वास्थ्य बाधित होत असून महिला, मुलींना ये-जा करणे कठीण झाले आहे. या दुकानापासून काही अंतरावर शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे तसेच दवाखाने आहेत. १०० मीटर अंतरावर वीर वामनराव जोशी विद्यालय, मारवाडी व गुजराती समाजाचे राधाकृष्ण मंदिर असून अन्य धर्मियांची पवित्र स्थळे आहेत. त्यामुळे येथे दारूचे दुकान असणे हे नियमात बसत नाही, तरीही राज्य उत्पादन शुल्क विभाग हे दुकान हटविण्यासंदर्भात कार्यवाही करीत नाही, असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे महिलांनी केला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ा महिलांच्या तक्रारीची दखल घेत एक्साईजला वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहे. एकिकडे नागरिकांची दारुबंदीची मागणी, दुसरीकडे शासनाने महसूल वाढविण्याचे आदेश दिल्यामुळे एक्साईजचे अधिकारी गोंधळून गेले आहेत. शहरात पाच ते सहा देशी दारु विक्रीची दुकाने कायमस्वरुपी हद्दपार करण्याची मागणी वाढत आहे. अशातच भाजीबाजारातील दारु दुकानाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना पाठविणे अनिवार्य असल्याने एक्साईजने २८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान दारु विक्री दुकानाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र आंदोलक महिलांना २४ एप्रिल रोजी पाठविले आहे.
धार्मिक, सामाजिक स्थळापासून या दुकानाचे अंतर, आक्षेप पडताळणी करण्यासाठी एक्साईजची चमू येणार आहे. या चमूच्या अहवालावरच देशी दारु विक्रीच्या दुकानाचे भवितव्य ठरेल, असे संकेत आहे. भाजी बाजारातील दारुबंदीच्या लढ्यात अंजली पाठक, कुंदा अनासने, शालिनी रत्नपारखी, कोकीळा सोनोने, रश्मी उपाध्ये, लता राजगुरे, संगीता घोडे, ललिता ठाकरे, वर्षा किलोर, निर्जला करुले, मंदा चव्हाण, निर्मला सावरकर, उज्ज्वला करुले, वैशाली बोबडे, लता राजगुरे, शोभा काळे, ज्योती कानतुरे, सुनीता देशमुख, प्रतिभा देशमुख आदी महिलांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दारु विक्रीच्या दुकानाबाबत पडताळणीचे पत्र प्राप्त झाले आहे. ही पडताळणी वस्तुस्थितीदर्शक झाली तर हे दुकान भाजीबाजारात ठेवता येणार नाही. पडताळणी होत असल्याने लढ्याचे पहिले यश आहे. यात एक्साईजने काही गडबड केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील. दारुबंदीचा लढा सुरुच राहील.
अंजली पाठक
आंदोलक महिला, भाजीबाजार