उर्दू शिक्षकांची नियुक्ती वादग्रस्त
By Admin | Updated: April 28, 2015 00:07 IST2015-04-28T00:07:13+5:302015-04-28T00:07:13+5:30
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महापालिकेकडून हस्तांतरीत झालेल्या १७ उर्दू माध्यमांच्या शिक्षकांच्या पदस्थापना करतांना ..

उर्दू शिक्षकांची नियुक्ती वादग्रस्त
जिल्हा परिषद : सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले
अमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महापालिकेकडून हस्तांतरीत झालेल्या १७ उर्दू माध्यमांच्या शिक्षकांच्या पदस्थापना करतांना नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील शाळेवर अन्याय केल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्य निशांत जाधव यांनी केला आहे. या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. यावेळी आरोग्य विभागाच्या मुद्यावर वादळी चर्चा झाली.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाला महापालिकेने मागील दोन महिन्यांपूर्वी १७ उर्दू माध्यमांचे शिक्षक हस्तांतरीत केले होते. मात्र या शिक्षकांना शाळेवर नियुक्ती देतांना मोर्शी, वरूड, अचलपूर या तीन तालुक्यात सर्वाधिक नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, नांदगाव खंडेश्र्वर येथील उर्दू शाळेत ३ शिक्षक कमी असल्याने या शाळेला दोन वर्षापासून शिक्षक देण्याची मागणी सदस्य निशांत जाधव यांनी केली होती. याची शिक्षण विभागाने दखल न घेता येथे केवळ एकाच शिक्षकाला पदस्थापना शिक्षण विभागाने दिल्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना सभागृहात जाब विचारला. अशातच सदस्य अभिजित ढेपे, रवींद्र मुंदे , बापूराव गायकवाड यांनी या मुद्दावर आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहाचे वातावरण तापले. अखेर सदस्यांचा आक्रमकपणा पाहूण याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन अध्यक्ष सतीश उईके, सभापती गिरीष कराळे यांनी दिले. यासोबतच शिकस्त वर्ग खोल्याचा मुद्दा पंचायत समितीचे सभापती गणेश राजनकर यांनी बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना उत्तर विचारत यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, अन्यथा शाखा अभियंत्यास काळे फासण्याचा इशारा दिला आहे. यावेळी आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामकाजाच्या मुद्यावरही वादळी चर्चा करण्यात आली. सभेच्या विषय सूचीवरील जिल्हा परिषद भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उपविभागातील हातपंप, विद्युत पंप दुरूस्तीचे दरात वाढ करण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. दरम्यान यावर वादळी चर्चा होऊन अखेर हा ठराव मंजूर करण्यात आला.
आरोग्य सर्वसाधारण क्षेत्र प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकामे अंतर्गत सन २०१०-११ लेखाशिर्ष अंतर्गत कामांनाही सभागृहाने मंजुरी दिली आहे. याशिवाय तीन वर्षावरिल प्रलंबित प्रवास भत्ते देयकास व मौजे रेवसा येथील पुनर्वसित गावात पाणी पुरवठा योजनेच्या कामाची १ टक्का बयाणा रक्कम सुरक्षा ठेवीची रक्कम परत करण्याची प्रस्तावास सभागृहाने मंजुरी दिली.
सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश उईके, उपाध्यक्ष सतिश हाडोळे, सभापती गिरीष कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, माजी अध्यक्ष तथा सदस्य बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, रविंद्र मुंदे, प्रताप अभ्यंकर, अभिजित ढेपे, प्रवीण घुईखेडकर, मोहन सिंगवी, उमेश केने, विक्रम ठाकरे, निशांत जाधव, मनोहर सुने, ममता भांबुरकर, पं.स. सभापती विनोद टेकाडे, आशिष धर्माळे, सिईओ अनिल भंडारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी के.एम अहमद, जे. एन आभाळे, कैलास घोडके, खाते प्रमुखांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)