राष्ट्रीय लोकअदालत: भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा! मिटविले १६ कौटुंबिक वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 17:12 IST2023-04-30T17:12:30+5:302023-04-30T17:12:52+5:30
‘भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा’ असा संदेश देत त्या १६ प्रकरणांपैकी पाच जोडप्यांचा संसार जुळविण्यात आला. ते एकत्र संसार करण्यासाठी घरी परतले. तर उर्वरित प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली.

राष्ट्रीय लोकअदालत: भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा! मिटविले १६ कौटुंबिक वाद
अमरावती : येथील कौटुंबिक न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यात ५३ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली. पैकी एकूण १६ प्रकरणे निकाली काढण्यात आले. ‘भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा’ असा संदेश देत त्या १६ प्रकरणांपैकी पाच जोडप्यांचा संसार जुळविण्यात आला. ते एकत्र संसार करण्यासाठी घरी परतले. तर उर्वरित प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली.
लोकअदालतीमध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी ए. कस्तुरे यांनी पॅनल जज म्हणून कर्तव्य पार पाडले तसेच अधिवक्ता तृप्ती दुबे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. लोक अदालतीला जिल्हा न्यायाधिश आर. व्ही. ताम्हाणेकर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील यांनी भेट दिली.
न्यायाधीश आर. आर. पोंदकुले यांच्या मार्गदर्शनात विवाह समुपदेशक एस. एन. वेलरांधे, प्रभारी प्रबंधक उषा तिवारी, न्यायालयीन व्यवस्थापक धनंजय क्षिरसागर, लिपिक अलका चौबे, स्नेहा इंगोले, एस. आर. बाकडे यांनी परिश्रम घेतले.
नातवामुळे घडून आला समेट -
कौटुंबिक न्यायालयातील लोक अदालतीत मिटविण्यात आलेल्या १६ प्रकरणापैकी पाच प्रकरणातील पक्षकारांनी आपसातील वाद मिटवून नव्याने संसार करण्याचा निर्णय घेतला. एका प्रकरणात आजी आजोबांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूपश्चात नातवाच्या भेटीकरीता प्रकरण दाखल केले होते. लोकअदालतीत सासु, सासरे व सुनेमधील तुटलेला संवाद पुनश्च सुरू होवुन नातवाच्या भेटीसंदर्भात आपसी समजोता झाला. ही बाब लोकअदालतमध्ये विषेश उल्लेखनीय ठरली.