'मी घरात बसून होतो, पण कोणाचे घर फोडले नाही', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 13:23 IST2023-07-10T13:11:32+5:302023-07-10T13:23:16+5:30
Uddhav Thackeray 'शिवसैनिकांनी तुम्हाला खांद्यावर घेतलं, आज तुम्ही आम्हाला राजकारणातून संपवायला निघालात.'

'मी घरात बसून होतो, पण कोणाचे घर फोडले नाही', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
अमरावती- शिवसेना(उबाठा) गटाचे प्रमुख उद्ध ठाकरे Uddhav Thackeray दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी अमरावतीत एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. काही बोगस लोक म्हणतात की मी भीक मागायला आलो आहे. होय, मी मतांची भीक मागायलाच आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तुम्ही घरफोडे आहात
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, माझ्यावर टीके होते की मी इतके दिवस घरी बसून होतो. होय, मी घरी बसून होतो, पण मी कोणाचे घर फोडले नाही. घरफोडे तुम्ही आहात. मी घरात बसून जे काम केले, ते तुम्हाला घर फोडूनही करता येत नाही. त्यामुळेच तुम्हाला दारोदारी जावं लागत आहे. सरकार आपल्या दारी म्हणता, पण तुम्हाला कोणी दारातही उभं करत नाही. मग अंगणवाडी सेविकांना बोलवता, पोलिसांना साध्या कपड्यात बसवता.
पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद । अमरावती - #LIVEhttps://t.co/wi1OfhB1iG
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 10, 2023
भाजपला स्ततेची मस्ती
तुम्हाला आमदार विकत घेता येतात, पण त्याच पैशातून माणसांना वाचवता येत नाही. माणसं वाचवले तर त्यांच्या आशिर्वादाने तुम्हाला कुणाला विकत घेण्याची गरज लागणार नाही. कामच करायचे नाही. हे फोड, ते फोड करायचे. जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवता, मग तुम्हाला अजूनही इतर पक्ष फोडायची काय गरज? शिवसेना चोरली, आता राष्ट्रवादी चोरताय. देशातील गोष्टी विकायच्या आणि दुसऱ्यांचे चोरायचे. भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, पण त्यांच्यात आत्मविश्वास नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
तुम्ही नामर्द आहात
ठाकरे पुढे म्हणाले, तुम्ही सत्ताधीश आहात, पण निवडून येईल असे वाटत नाही. म्हणूनच ईडी, सीबीआयला मागे लावता. मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा बाजुला ठेवून समोर या. राजकारणातले नामर्द तुम्ही. तुमचे दोन खासदार होते, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशावरुन शिवसैनिकांनी तुम्हाला खांद्यावर बसून महाराष्ट्रात फिरवलं आणि तुम्हीच आम्हाला राजकारणातून संपवायला निघालात.
हेच तुमचे हिंदूत्व...
आम्ही 25 वर्षेत तुमच्या सोबत राहिलो, तुम्ही आम्हालाच संपवायला निघालात. तुम्ही शून्य होता, अटलजींनी तुम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकले होते. तेव्हा ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं, त्यांचाच पक्ष संपवता. बाळासाहेब नसते तर आज तुम्हाला कोणी विचारलं नसतं. शिवसेना संपवायची आणि गेल्या आठवड्यात ज्यांच्याविरोधात 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, तोच पक्ष तुम्ही सोबत घेतला. हेच तुमचे हिंदूत्व आहे का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.