पोहरा-चिरोडी जंगलात दोन वाघ
By Admin | Updated: January 7, 2017 00:09 IST2017-01-07T00:09:36+5:302017-01-07T00:09:36+5:30
पोहरा-चिरोडी वनपरिक्षेत्रात एक नव्हे दोन वाघांच्या ्नखुणा आढळल्या आहेत.

पोहरा-चिरोडी जंगलात दोन वाघ
वनकर्मचाऱ्यांना व्याघ्रदर्शन : वनविभाग ‘अलर्ट’, बिबट्यांनीही हलविला मुक्काम
अमोल कोहळे पोहरा बंदी
पोहरा-चिरोडी वनपरिक्षेत्रात एक नव्हे दोन वाघांच्या ्नखुणा आढळल्या आहेत. इतकेच नव्हे तर वरूड्याच्या जंगलात वनकर्मचाऱ्यांचा चक्क वाघाशी सामना झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल ८० किलोमीटरचा प्रवास करून पोहरा-चिरोडी जंगलात वाघाचे आगमन सुखावणारे असले तरी दोन वाघांचे अस्तित्व असल्याने या जंगलातील बिबट्यांनी जंगल परिसरातून काढता पाय घेतला आहे.
पोहरा-चिरोडी जंगलात बिबट्यांची संख्या २० ते २५ च्या घरात आहे. काही दिवसांपासून बोर व्याघ्र प्रकल्पातील दोन पट्टेदार वाघांचे जंगलात आगमन झाले आहे. वाघांनी ज्या भागात आपला घरोबा केला त्या भागातील बिबट्यांनी जागा सोडली असून संघर्षाऐवजी दुसरी जागा शोधताना बिबट्यांची दमछाक होत आहे.
जंगलात
प्रवेश मनाई
अमरावती : या जंगलात चितळ, रोही, हरिण, सांबर, रानडुकरांची संख्या अधिक असल्याने बिबट्यांना पोषक वातावरण आहे. वन्यप्राणी अधिक असल्याने बिबट आणि आता वाघांचे अस्तित्वदेखील या जंगलात वाढीस लागले आहे.
हे वाघ दोन महिन्यांपासून १५ ते २० किमीच्या परिघात फिरत आहेत. सोमवारी जंगलगस्तीवर असलेल्या चिरोडी वर्तुळातील दोन वनरक्षक आणि दोन वनमजुरांना ५ वाजताच्या सुमारास वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. जंगलात वाघ आल्याने बिबट्यांनी पोहरा, चिरोडी, बोडणा, सावंगा, कस्तुरा, हातला, भालखेड, इंदला, कारला, मार्डी गावाच्या शेतापर्यंत येण्याची मजल गाठली आहे. बिबट्यांनी शेतशिवारात मुक्त संचार सुरू केल्याने जंगलातील तलावावर जनावरांना पाणी पिण्याकरिता जाऊ देऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. तसेच नागरिकांनीसुद्धा पूर्वपरवानगीशिवाय जंगलात प्रवेश करू नये, असे वनविभागाद्वारे सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)
वनविभागाचे सगळे लक्ष वाघांकडे
पोहरा-चिरोडी जंगलात वाघांचे आगमन झाल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाचे व वन्यप्रेमींचे सगळे लक्ष या वाघांकडे लागून राहिले आहे. उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी पोहरा-चिरोडी जंगल परिसरात २० ट्रॅप कॅमेरे लावले असून दोन्ही वनवर्तुळाचे कर्मचारी मॉनिटरिंंग करित आहेत. पुन्हा दुसऱ्या वाघाचे जंगलात आगमन झाल्याने चिरोडी-पोहऱ्याचे वनकर्मचारी अधिकारी त्यांच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेऊन आहेत.
बोर ते पोहरा कॅरिडोर हवे
बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघ पोहरा- चिरोडी ये-जा करित असल्याने या मार्गावर कॅरिडोर करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोरमधील वाघांचा या भागातील वावर आता वारंवार सिद्ध झाला आहे.
वनक्षेत्रानजिकच्या तलावावर जनावरांना पाणी पिण्यास जाऊ देऊ नये. ग्रामस्थांना देखील प्रवेशबंदी केली आहे. तशा सूचना वनकर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
- अनंत गावंडे, वनपरिक्षेत्राधिकारी