प्रतीक्षा मेहेत्रे हत्ये प्रकरणात ठाणेदारासह दोन पोलीस शिपाई निलंबित, पोलीस आयुक्तांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 21:36 IST2017-11-27T21:36:00+5:302017-11-27T21:36:13+5:30
अमरावती : राज्यभरात खळबळ उडविणा-या प्रतीक्षा मेहेत्रे हत्या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि इतर दोन पोलीस कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले

प्रतीक्षा मेहेत्रे हत्ये प्रकरणात ठाणेदारासह दोन पोलीस शिपाई निलंबित, पोलीस आयुक्तांची कारवाई
अमरावती : राज्यभरात खळबळ उडविणा-या प्रतीक्षा मेहेत्रे हत्या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि इतर दोन पोलीस कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास तसे आदेश जारी केले.
निलंबितांमध्ये ठाणेदार राहुल आठवले, पोलीस शिपाई गौतम धुरंदर आणि ईशय खांडे यांचा समावेश आहे. या तिघांव्यतिरिक्त फ्रेजरपुरा ठाण्यातील अन्य काही पोलीस कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिशी बजावण्यात आल्या आहेत. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मेहेत्रे कुटुंबीयांची शुक्रवारी उशिरा रात्री भेट घेतली होती. मेहेत्रे कुटुंबीयांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीची तक्रार पाटील यांच्याकडे केली होती. पोलिसांनी कर्तव्यदक्षता राखली असती तर आमची मुलगी जिवंत असती, असे मत प्रतीक्षाच्या आई-वडिलांनी नोंदविले होते. त्याच भेटीदरम्यान ना. पाटील यांनी मर्यादित कालावधीत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त पी. डी. डोंगरदिवे यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी चौकशी अहवाल पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला. ठाणेदार आणि इतर दोघांवर ठपका ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
काय आहे प्रकरण ?
गुरुवारी भरदुपारी वृंदावन कॉलनीत प्रतीक्षा मेहेत्रेची हत्या करण्यात आली. त्यापूर्वी बुधवारी सायंकाळी प्रतीक्षा व तिच्या वडिलाने आरोपी राहुल भडविरुद्ध तक्रार नोंदविली होती. १५, २२ नोव्हेंबरला प्रतीक्षाने फ्रेजरपुरा ठाण्यात राहुलविरुद्ध तक्रार नोंदविली. तथापि, ठाणेदार राहुल आठवले यांनी त्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही, आरोपीला बोलावून समज व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे सौजन्य आठवले यांनी दाखविले नाही.
एसीपी दर्जाच्या चौकशी अधिका-याने दिलेल्या अहवालानुसार ठाणेदारांसह तिघे दोषी आढळले. त्यांना निलंबित करण्यात आले.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती