वर्षभरात दोन लाख शेतकरी कर्जासाठी सावकाराच्या दारी पोहचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:18 IST2025-04-30T12:17:36+5:302025-04-30T12:18:09+5:30

Amravati : २५५ कोटींचे कर्जवाटप, अनधिकृत सावकारांचे कर्ज शेकडो कोटींच्या घरात

Two lakh farmers approached moneylenders for loans in a year | वर्षभरात दोन लाख शेतकरी कर्जासाठी सावकाराच्या दारी पोहचले

Two lakh farmers approached moneylenders for loans in a year

गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
शेती बेभरवशाची झाल्याने वर्षभरात ९६ हजार शेतकऱ्यांना सावकाराच्या दाराचे उबंरठे झिजवावे लागले. यामध्ये मार्चअखेर ६३५ परवानाधारक सावकारांनी १,९१,२७१ शेतकऱ्यांसह आर्थिक अडचणीतील नागरिकांना २५४०८.५३ कोटींचे कर्जवाटप केले आहे. शिवाय हजारो अवैध सावकारांनी मनमानी व्याजाने वाटलेले कर्ज शेकडो कोटींच्या घरात आहे.


बँकांद्वारे कर्जवाटपात सिबिल स्कोअर पाहिला जातो, शिवाय जास्तीची कागदपत्रेही मागितली जातात. अनेकदा शेतकऱ्यांजवळ पुरेशी कागदपत्रे नसतात. बँकांद्वारे कर्जवाटपात दिरंगाईचे प्रकार होतात. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना सावकाराच्या दारी जावे लागते. सहकार विभागाद्वारे ५०० रुपयांत सावकारीचा परवाना मिळत असल्याने जिल्ह्यात सावकारांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ६३५ परवानाधारक सावकार आहेत. परवानाधारक सावकारांना कृषी कर्ज वाटपास मनाई असली तरी बिगर कृषी कर्ज, तारण कर्ज व बिगर तारण कर्ज या प्रकारांमध्ये जिल्ह्यात रेकार्डवर २५४ कोटींचे कर्जवाटप केले आहे. कित्येक परवानाधारक सावकार अवैध सावकारीत गुंतल्याने त्यांचे व इतर विनापरवाना सावकारांचे कर्जवाटप याची माहितीच उपलब्ध होत नाही.


परवानाधारक सावकारांचे कर्जवाटप (मार्च २५ अखेर)
बिगर कृषी कर्जदार - ९५६३५
वाटप केलेले कर्ज - १२७०४.३७ लाख
तारण कर्जदार - ९४८८२
वाटप केलेले कर्ज - १२४८६.९९ लाख
विनातारण कर्जदार - ७५३
वाटप केले कर्ज - २१७.१७ लाख
एकूण वाटप कर्जदार - १,९१,२७१
सावकारांचे कर्जवाटप २५४०८.५३ लाख


कर्जवाटपाचे दर (प्रतिवर्ष)
शेतकऱ्यांकरिता 

तारण कर्ज - ९ टक्के
विनातारण कर्ज - १२ टक्के

शेतकऱ्यांशिवाय 
तारण कर्ज - १५ टक्के
विनातारण कर्ज - १८ टक्के


सोने, चांदी प्रॉमिसरी नोटवर देतात कर्ज
जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँका शेती तारणावर कर्ज देतात. या व्यतिरिक्त बिगर शेती कर्ज, तारण कर्ज व बिगर तारणी कर्ज हे सोने, चांदी व प्रॉमिसरी नोटवर दिले जाते असे सहकार विभागाने सांगितले.


सावकारांचे फुटले पेव, अमरावतीत सर्वाधिक
पेसा क्षेत्रातील चिखलदरा तालुका वगळता जिल्ह्यात ६३५ परवानाधारक सावकार आहेत. यामध्ये सर्वाधिक २३७अमरावती तालुक्यात, अचलपूर १४९, मोर्शी ३३, अंजनगाव २३, धामणगाव रेल्वे २८, वरुड ४०, धारणी २०, नांदगाव खंडेश्वर १४, चांदूररेल्वे ९, चांदूरबाजार ४२, तिवसा १८ व दर्यापूर तालुक्यात १४ सावकार आहेत. या सर्वसावकारांना दरवर्षी परवाना नुतनीकरण करणे बंधनकारक आहे.


"परवानाधारक सावकारांनी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुद व शासन निर्णय तथा वेळोवेळी शासनाकडून निर्गमित होणाऱ्या परिपत्रकानुसार करावे."
- शंकर कुंभार, जिल्हा उपनिबंधक 

Web Title: Two lakh farmers approached moneylenders for loans in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.