धामणगावात दीड हजार मतदारांची दोन किमी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST2021-01-15T04:11:32+5:302021-01-15T04:11:32+5:30
गटातटाचा ओढवून घ्यावा लागतोय रोष : कुठे नदी, तर शेत पार करून बजवावा लागतोय हक्क मोहन राऊत धामणगाव रेल्वे ...

धामणगावात दीड हजार मतदारांची दोन किमी पायपीट
गटातटाचा ओढवून घ्यावा लागतोय रोष : कुठे नदी, तर शेत पार करून बजवावा लागतोय हक्क
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : गावातील प्रभागनिहाय मतदान केंद्र निर्माण करताना मतदार संख्येची अट असल्याने तालुक्यातील सहा गावांतील तब्बल दीड हजार मतदारांना मतदानासाठी कुठे एक, तर कुठे तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. दरम्यान एखाद्या राजकीय गटाच्या ऑटोरिक्षातून गेल्यास दुसऱ्या गटाचा रोष ओढवून घ्यावा लागतो. त्यामुळे या भागातील ज्येष्ठ नागरिक मतदानाला पाठ देत असल्याचे वास्तव आजही पाहायला मिळणार आहे.
धामणगाव तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. प्रभाग तयार करताना ८०० मतदारांची गरज असते. प्रभाग निर्मिती करताना कोणत्या मतदाराचे कुठे वास्तव्य आहे, या मुख्य बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि याचा फटका मतदारांना अनेक पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत बसत आहे. चिंचोली - जनकापूर या ग्रामपंचायतीत जानकापूर येथील प्रभाग क्रमांक दोन मधील शंभरपेक्षा अधिक मतदारांना नदी पार करून चिंचोली येथे मतदानाला जावे लागणार आहे. वडगाव बाजदी येथील २५० मतदारांना वडगाव राजदी येथे मतदानासाठी एक किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे. जळगाव आर्वी येथील मतदारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. जळगाव आर्वी येथील रहिवासी मतदारांना प्रभाग क्रमांक तीन असलेल्या रामगाव येथे रेल्वे लाईन पार करून मतदानाला जावे लागेल, तर गंगाजळी येथील शंभरहून अधिक मतदारांना दोन किलोमीटरची पायपीट करून रामगाव येथे हक्क बजावण्यासाठी यावे लागणार आहे. सावळा ग्रामपंचायतमध्ये सालनापूर हे गाव येते. सावळा येथील वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये सालनापूरच्या २०० पेक्षा अधिक मतदारांना दोन किलोमीटरची पायपीट करीत सावळा येथे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेक वषार्पांसून जावे लागत आहे. बोरगाव निस्ताने या गट ग्रामपंचायतीमध्ये खानापूर हे गाव आाहे. खानापूरच्या शंभर वर मतदारांना बोरगाव निस्ताने येथे एक ते दीड किलोमीटर पायपीट करून यावे लागतात.
मतदानावर कोट्यवधींचा खर्च, पण मतदारांची व्यवस्था नाही
लोकसभा-विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीवर मतदान यादी तयार करण्यापासून तर बॅलेट पेपर मतमोजणीपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, ज्या मतदारांना मतदान करावे लागतात, त्यांची मतदान केंद्रापर्यंत जाण्याची व्यवस्था आजपर्यंत निवडणूक विभागाने केलेली नाही. गावापासून मतदान केंद्र दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी कोणतेही वाहन नाही. अशावेळी एखाद्या उमेदवारांच्या ऑटोरिक्षात तथा वाहनात मतदान करायला जावे लागतात. अशावेळी दुसऱ्या गटाच्या उमेदवाराच्या मनात साहजिकच शंकेची पाल चुकचुकते.
कोट १
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करण्यासाठी आम्हाला अप्पर वर्धाच्या कालवा रस्त्याने किंवा ऑटोरिक्षाने तीन किलोमीटर अंतर पार करून रामगावला मतदानाला जावे लागतात. आमच्या गावातच मतदानाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- संतोष सोनवणे,
जळगाव आर्वी मतदार
कोट २
प्रभात तयार करताना मतदारांची संख्याही गरजेचे असते. अशावेळी गट ग्रामपंचायतीत असलेली मतदार संख्या एकत्र केली जाते. प्रशासनाकडून मतदाराना केंद्रापर्यंत ने- आण करण्याची कोणतीही व्यवस्था नाही.
- जगदीश मंडपे,
नायब तहसीलदार, धामणगाव रेल्वे