लालखडीतून दोन किलो गांजा जप्त; एका आरोपीस अटक
By प्रदीप भाकरे | Updated: February 1, 2023 17:06 IST2023-02-01T17:05:24+5:302023-02-01T17:06:57+5:30
शहर गुन्हे शाखेची कारवाई

लालखडीतून दोन किलो गांजा जप्त; एका आरोपीस अटक
अमरावती : नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालखडी परिसरातून गांजा विक्री करीत असलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने ३१ जानेवारी रोजी रात्री अटक केली. आरोपीकडून ६० हजार रुपये किमतीचा दोन किलो गांजा जप्त करण्यात आला. शेख वसीम शेख महेबूब (३२, रा. लालखडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मंगळवारी रात्री शेख वसीम हा लालखडी परिसरातील रेल्वे रुळाजवळ गांजा विक्री करीत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या पथकाने लालखडी येथील रेल्वे रुळाजवळ सापळा रचून शेख वसीम याला अटक केली. त्याच्याकडून दोन किलो गांजा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी शेख वसीमविरुद्ध नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, राजूआप्पा बाहेणकर, फिरोज खान, सतीश देशमुख, अजय मिश्रा, सूरज चव्हाण, निवृत्ती काकड, सुधीर गुडधे यांनी ही कारवाई केली.