समृद्धी महामार्गावर कारचे टायर फुटले, दोन ठार, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 10:50 IST2023-04-13T10:49:55+5:302023-04-13T10:50:42+5:30
कारमध्ये चालकासह पाच जण होते

समृद्धी महामार्गावर कारचे टायर फुटले, दोन ठार, तिघे जखमी
नांदगाव खंडेश्वर : मुंबईकडून नागपूरकडे जाणाऱ्या एमएच ४७ - बीबी ६५७४ क्रमांकाच्या कारचे समोरील दोन्ही टायर फुटल्याने ती दुभाजकावर आदळली. या अपघातात दोघे ठार, तर तिघे जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात मंगरूळ चव्हाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत समृद्धी महामार्ग लेन क्रमांक १४९/३ परिसरात झाला.
कारमध्ये चालकासह पाच जण होते. अपघात बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. पुढचे दोन्ही टायर फुटल्याने कार नागपूर कॉरिडरवरून मुंबई कॉरिडरला आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल तावडे व राजू शिंदे (रा. दहिसर, मुंबई) हे दोघे जण जागीच ठार झाले. प्रवेश पाटील, बाळकृष्ण दबाले, चालक किशोर म्हात्रे (रा. मुंबई) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिस तपास मंगरूळ चव्हाळाचे ठाणेदार प्रमोद काळे हे करीत आहेत.