दोन तासांचा थरार अन् एक तास दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 12:38 PM2021-11-14T12:38:24+5:302021-11-14T12:40:59+5:30

दुपारी २ च्या सुमारास ‘बंद’ला रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर देण्यासाठी हजारोंचा जमाव चांदणी चौक ते पुढे सक्करसाथ भागात जमला. तेथून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. दुपारी २ ते ४ दरम्यान त्या भागात प्रचंड धुमश्चक्री उडाली.

Two hours of tremors and one hour of stone pelting | दोन तासांचा थरार अन् एक तास दगडफेक

दोन तासांचा थरार अन् एक तास दगडफेक

googlenewsNext
ठळक मुद्देशहरभरात खाकी, हल्लेखोरांची धरपकड

अमरावती : शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास भाजपजन ‘अमरावती बंद’साठी बाहेर पडले. राजकमल चौकात हजारो लोक एकत्र आले. जाळपोळ झाली. दगडफेक करण्यात आली. प्रभारी पोलीस आयुक्तांना घेरावदेखील घालण्यात आला. राजकमल चौक, नमुना भागात तणाव निर्माण झाला. तो शहर पोलिसांनी आटोक्यातही आणला. मात्र, त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास ‘बंद’ला रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर देण्यासाठी हजारोंचा जमाव चांदणी चौक ते पुढे सक्करसाथ भागात जमला. तेथून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. दुपारी २ ते ४ दरम्यान त्या भागात प्रचंड धुमश्चक्री उडाली. अमरावतीकरांनी त्या दोन तासात स्फोटक दहशतीचा थरार अनुभवला.            

तलवारी, सत्तूर, पाईप घेऊन सक्करसाथ, शनिमंदिर परिसरातील लुटपाट करण्यात आली. ‘ते’ पोलिसांशी भिडले. त्यामुळे रबर बुलेटने फायरिंग करण्यात आली. त्यातच अश्रुधुराचा वापर करण्यात आल्याने एकूण सहा जण जखमी झाले. सक्करसाथ भागातील आतील रस्न्यावर अक्षरश: तेलाचे पिंपं उलथविले. ते दोन तास पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. शहर तथा ग्रामीण पोलिसांच्या साथीने एसआरपीएफ आल्यानंतर तेथील परिस्थिती निवळली. मात्र, शनिवारी बंदला अराजकतेकडे नेले, ते त्या दोन तासातील घडामोडीने. शिवसेनेने देखील नमुना भागात विशिष्ट जमावाला जोरदार प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ पासून आयुक्तालय हद्दीत संचारबंदी लागू केलेली आहे. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर अफवांचे पीक आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सोमवारपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवली जाणार आहे.

१६ पर्यंत इंटरनेट बंद

शहर तथा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा १३ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ ते १६ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत बंद ठेवली जाणार आहे. शहर पोलिसांनी त्यासाठी गृहमंत्रालयाची परवानगी घेतली आहे. समाज माध्यमांतून प्रसारित होणारे फेक न्यूज व व्हिडीओंना अटकाव घ्यालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

तलवारी, सत्तुर हाती घेऊन धुमाकूळ

ईतवारा बाजार ते चांदनी चौक या मार्गावर सक्करसाथ येथे एका समुदायाकडून हातात तलवारी, सत्तुर घेऊन धुमाकूळ घालण्यात आला. या जमावाकडून पोलीस लक्ष्य करण्यात आले. प्रारंभी पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचा सल्ला दिला. काही धर्मगुरूंकडून आवाहनही करण्यात आले. मात्र, जमाव मोठ्या प्रमाणात असल्याने हातात तलवारी, सत्तुर हाती घेऊन धुमाकूळ घालत होता. दरम्यान पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी बरेचदा अश्रुधुरांना मारा केला. येथून दोघांकडून प्रत्येकी एक तलवार जप्त करण्यात आली.

एसीपी पूनम पाटील फ्रंटफुटवर

सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांनी शुक्रवारी सकाळपासून गाडगेनगर उपविभागातील अतिसंवेदनशील भागात मोर्चा सांभाळला. दुपारनंतर नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही भागात लूटपाट करण्यात आली. तेथे जमावात शिरून त्यांनी स्ट्राँग पोलिसिंग दाखविली. एक मोठा जमाव त्यांच्या दिशेने आला. त्यांनी त्यांच्या दिशेने दगडदेखील भिरकावले. मात्र, त्या हटल्या नाहीत. त्या संपूर्ण काळ हल्लेखोरांच्या अटकावासाठी अग्रणी होत्या. डीसीपीद्वय मकानदार व साळी, सर्व ठाणेदार, क्राईम पीआय ठोसरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे, आसाराम चोरमले, पुंडलिक मेश्राम, नीलिमा आरज हे २४ तास रस्त्यावर होते.
 

कोतवालीत दोन गुन्हे !

भाजपच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी अमरावती बंद पुकारला होता. त्यांच्यासह त्यांच्यापैकी ज्यांनी जाळपोळ, दगडफेक केली, अशांविरूद्ध शहर कोतवाली पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शहर कोतवाली पोलिसांकडून देण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सक्करसाथ परिसरात धुमाकूळ माजविणाऱ्यांविरूद्ध देखील गुन्हे नोंदविले जाणार आहेत.

‘वज्र’ येताच टाळ्या वाजवून केले स्वागत
भाजप व समविचारी पक्षाने शनिवारी पुकारलेला बंद कडकडीत पाळला गेला. एकूणच बाजारपेठ पूर्णत: बंद होती. दरम्यान राजकमल चौकात मोठ्या संख्येने भाजप, सेना, बजरंग दल, मनसे, विहिंपचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र आले होते. यावेळी देशाभिमानाचे नारे लागले. दरम्यान परिस्थिती नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाकडून पाण्याचा मारा करणारे ‘वज्र‘ हे वाहन राजकमल चौकात येताच उपस्थित समुदायांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

अपर पोलीस महासंचालकांनी घेतला आढावा

राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह हे सायंकाळी ६.३० च्या सुमारास शहरात पोहोचले. त्यांनी प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील व एसआरपीएफचे समादेशक हर्ष पोदार यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. शहरात संचारबंदीची त्वरेने कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागपूरच्या नक्षलविरोधी पथकाचे डीआयजी संदीप पाटील यांना शनिवारी तातडीने प्रभारी पोलीस आयुक्त म्हणून अमरावतीला पाठविण्यात आले. 

Web Title: Two hours of tremors and one hour of stone pelting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.