पुरातून वाचले अन् पोलिसांचे फटके मिळाले, तळीरामांची उतरली झिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 18:11 IST2022-07-25T16:36:22+5:302022-07-25T18:11:54+5:30
पट्टीच्या पोहणाऱ्यांनी सोकी नदीपात्रातून दोन मद्यपींना काढले बाहेर

पुरातून वाचले अन् पोलिसांचे फटके मिळाले, तळीरामांची उतरली झिंग
जरूड (अमरावती) : शेकदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे जरूडच्या सोकी नदीला आलेल्या पुरात आठवडी बाजारातील पुलाजवळून दोन तरुण वाहून गेल्याने खळबळ माजली होती; परंतु, आठवडी बाजारातील पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी त्यांचे प्राण वाचविले. मात्र, वाहत गेलेले तरुण दारूच्या नशेत आढळल्याने पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
सोकी नदीला पूर आलेला असताना गावातील गुड्डू अनूप हाडे आणि रामदास वसुले हे मद्यपी तरुण पुलावर धिंगाणा घालत होते. आठवडी बाजार असल्याने नागरिकांची गर्दी येथे होती. ते या तरुणांना पुलावरून परतण्याचे वारंवार आवाहन करीत होते; परंतु दारूच्या नशेत असलेल्या या तरुणांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, पाण्याचा लोंढा वाढल्याने ते नदीच्या प्रवाहात वाहत गेले. नागरिकांच्या सतर्कतेने या दारुड्या तरुणांचे प्राण वाचविण्यात नागरिकांना यश आले.