मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्याचा नागपूर येथे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:50 PM2020-01-10T18:50:22+5:302020-01-10T18:50:55+5:30

नेत्यांच्या शाळेत सुविधांचा अभाव

Tribal student of Melghat dies in Nagpur | मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्याचा नागपूर येथे मृत्यू

मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्याचा नागपूर येथे मृत्यू

Next

अमरावती: अमरावती तालुक्यातील जामली आर येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा नागपूर येथे शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. जामली आर येथील विद्यार्थी हा आजारी असल्याचे सांगण्यात आले. सुभाष सोमाजी धिकार (१४, रा. बोरदा, ता. चिखलदरा) असे नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने मेळघाटातील आश्रमशाळा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. 

गौरखेडा बाजार स्थित गाविलगड शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या जामली आर येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत इयत्ता आठवीत सुभाष शिकत होता. मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे या संस्थेचे सचिव आहेत. काही दिवसांपासून आजारी असल्याने सुभाषला ५ जानेवारी रोजी नजीकच्या टेम्ब्रुसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तेथून पुढे अचलपूर व अमरावती येथे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने ८ जानेवारी रोजी नागपूर येथे हलविले. तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्याला ताप, पीलिया आणि किडनीवर सूज आल्याचे सांगण्यात आले.
 
सुविधांचा अभाव, आठवड्यात दुसरा मृत्यू

मेळघाटात आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव असल्याने आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना आंघोळीसह प्रात:विधीसाठी नदी-नाल्यांचे पाणी वापरावे लागते. दूषित पाणी प्यावे लागत असल्याने आजाराला आमंत्रण मिळते. याच आठवड्यात धारणी तालुक्यातील टिटंबा येथे एका विद्यार्थ्याचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला.

जामली आर येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी आजारी होता. त्याला नागपूर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 
- मिताली सेठी, प्रकल्प अधिकारी, धारणी

Web Title: Tribal student of Melghat dies in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.