स्टार बसेसवरून परिवहन समिती सदस्य आक्रमक
By Admin | Updated: March 27, 2015 00:01 IST2015-03-27T00:01:22+5:302015-03-27T00:01:22+5:30
केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी उत्थानांतर्गत महापालिकेला मंजूर स्टार बसेस तपासणीसंदर्भात गुरुवारी ...

स्टार बसेसवरून परिवहन समिती सदस्य आक्रमक
अमरावती : केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी उत्थानांतर्गत महापालिकेला मंजूर स्टार बसेस तपासणीसंदर्भात गुरुवारी आयोजित सभेत परिवहन समिती सदस्य प्रशासनाच्या एककल्ली काराभाराविरुद्ध प्रचंड आक्रमक झालेत. स्टार बस अमरावतीत आल्यानंतर सदस्यांना माहिती दिली जात नाही, हे शल्य व्यक्त करीत सदस्यांनी सभा स्थगित केली.
स्व.सुदामकाका देशमुख सभागृहात परिवहन समितीच्या सभापती दिव्या सिसोदे यांच्या अध्यक्षस्थानी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कांचन ग्रेसपुंजे, दीपमाला मोहोड, वनिता तायडे, सविता लाडेकर, जयश्री मोरे, अ. रफीक, रहिमाबी सादिक आयडीया आदी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी वाहन कार्यशाळा विभागाचे दिलीप पडघन, स्वप्नील जसवंते यांनी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्टार बसेसची तपासणी करुन घेणे आवश्यक असल्याची बाब उपस्थित केली. मान्यताप्राप्त संस्थेकडून ६४ बसेसची तपासणी अनिवार्य असून त्याकरिता ७ लाख २१ हजार ३५१ रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, या प्रस्तावाला बाजूला ठेवत महिला सदस्य आक्रमक झाल्यात. स्टार बसेस निविदा प्रक्रिया, नियमावली, बस शहरात आल्यानंतर माहिती दिली जात नाही, या विषयावर सभा गाजली. यावेळी अधिकाऱ्यांना सुद्धा सदस्यांना व्यवस्थित माहिती देता आली नाही, हे विशेष. स्टार बस अमरावतीत आली असताना ती सदस्यांना प्रत्यक्ष दाखविता आली नाही. स्टारबस ही अमरावतीची नसून ठाणे महापालिकेची होती, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे सभापती दिव्या सिसोदे यांच्यासह अन्य महिला सदस्य आक्रमक झाल्यात. बस अमरावतीत प्रात्यक्षिकासाठी आली असताना ती का बरं दाखविण्यात आली नाही, यावरुन ताशेरे ओढण्यात आले. वाहन कार्यशाळा विभागातील अधिकारी हे सकारात्मक उत्तर देण्यास असमर्थनीय असल्याचा आरोप करुन सभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पुढील सभेत सदस्यांच्या मागणीनुसार आवश्यक ती माहिती घेतल्यानंतरच पुढील विषयाला मंजुरी दिली जाईल, असे सर्वानुमते ठरले. बसेस तपासणीचा प्रस्ताव फेटाळत योग्य ती माहिती दिल्याशिवाय पुढे काहीही नाही, असे ठरवीत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. परिवहन समितीची पहिलीच सभा वादग्रस्त ठरल्याने जणू स्टार बसेसला ग्रहण तर लागणार नाही, असे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)