मेळघाटातील ५२ अतिदुर्गम शाळांत महिला शिक्षकांच्या बदल्या बंद ; सीईओंचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 17:23 IST2026-02-19T17:16:26+5:302026-02-19T17:23:04+5:30
सीईओंनी जारी केली गावांची यादी : चिखलदरा, धारणी तालुक्यातील गावांचा समावेश

Transfers of female teachers stopped in 52 remote schools in Melghat; CEO's big decision
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या मेळघाट या आदिवासीबहुल क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या चिखलदरा तालुक्यात ३८ तर धारणीमधील १४ अशा ५२ शाळांची महिला शिक्षकांच्या बदलीकरिता अवघड क्षेत्रातील अतिदुर्गम भागातील शाळा प्रतिकूल म्हणून सीईओ संजीता महापात्र यांनी घोषित केलेल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षक बदल्यांमध्ये महिला शिक्षकांना या शाळांमध्ये प्रशासकीय व अथवा बदली नियुक्ती दिली जाणार नसल्याने महिला शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या मेळघाटातील काही शाळा दुर्गम व अतिदुर्गम भागात आहेत. काही शाळांच्या ठिकाणी पायी दोन ते तीन तास चालावे लागते. याशिवाय शाळांकडे जाताना जंगलातून व निर्जन ठिकाणावरून जावे लागते व स्थानिक परिस्थिती महिला शिक्षकांना काम करण्यास प्रतिकूल आहेत. अशा मेळघाट अवघड क्षेत्रातील गैरसोयीच्या शाळांमध्ये महिला शिक्षकांना नियुक्तीने अथवा प्रशासकीय बदलीने पदस्थापना न देण्याबाबत शासन निर्णय तरतूद आहे. जि.प.च्या प्राथमिक व माध्यमिक शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित केल्या आहेत.
अवघड व अतिदुर्गम गावांचा समावेश
त्यामुळे ज्या शाळा अतिदुर्गम भागात आहेत आणि महिला शिक्षकांसाठी काम करण्यास प्रतिकूल म्हणून घोषित करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेच्या सीईओंनी करणे अपेक्षित आहे. तसेच चिखलदरा आणि धारणी येथील पंचायत समितीचे बीडीओ व बीईओ यांनी अवघड क्षेत्रातील अतिदुर्गम गावांचा, शाळांचा संयुक्त अहवाल सादर केलेला आहे.
प्राप्त अहवालानुसार निर्णय
सीईओंनी शासनाच्या आदेशानुसार व स्थानिक पंचायत समितीकडून प्राप्त अहवालानुसार चिखलदरा तालुक्यातील ३८ व धारणीमधील १४ अशा ५२ शाळा अतिदुर्गम शाळा या महिला शिक्षकांना काम करण्यास प्रतिकूल घोषित केल्या आहेत. घोषित केलेल्या शाळांमध्ये महिला शिक्षकांना प्रशासकीय बदलीने अथवा नियुक्त्तीने पदस्थापना देऊ नये, असे आदेश सीईओ संजीता महापात्र यांनी जारी केले आहेत.
या ५१ शाळांत राहणार नाहीत शिक्षिका
जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकारी संजीता महापात्र जारी केलेल्या अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये चिखलदरा तालुक्यातील रायपूर, रेट्याखेडा, बोराट्याखेडा, दाभिया, चोबिता, लाखेवाडा, बोंदू, बारूणव्हाण, लाखेवाडा, बोरू, मारीझडप, नवलगाव, चुनखडी, खडीमल, खंडूखेडा, आवागड ढाकना, मारोता, सरवारखेडा, सिमोरो, सिमोरो ढाणा, कुही, डोमी, चिलाटी, रुईपठार, भूत्रुम, भांडुप, खुटीदा, सलिता, सुमिता, एकताई, बदनापूर ढाणा, हतरू सरपंच ढाणा, राहूमधील पिपल्या, टेंब्लू, बोरदा, खारो, हिरवा, मोथाखेडा, लवादावन, धारणी पंचायत समितीमधील किन्होखेडा, धोकडा, चोपन, खोपमार, कुंड, रंगबेली, खामदा, तांगडा मालूर फॉरेस्ट, चाकदा, बुलुमगव्हाण, मोगदा, परसोली, पळसकुंडो, धारणमहू, चेथर आदी ५२ शाळांमध्ये महिला शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील महिला शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वाहनाअभावी पायी काढावी लागते वाट
मेळघाट या आदिवासी बहूल भागातील ५२ गावात दळणवळणाची कुठलीही सोय नाही. त्यामुळे या गावात जायचे झाले तर पायी दोन ते तीन तास चालत जावे लागते.