Transfer the larvae to the pan cake | पॅन केकमध्ये अळ्या विद्यार्थ्यांना उलट्या
पॅन केकमध्ये अळ्या विद्यार्थ्यांना उलट्या

ठळक मुद्देशाळेतील प्रकार । वाढदिवसानिमित्त केक वाटपादरम्यानची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना केक वाटप करताना, त्या केकमध्ये अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी कॅम्प रोड स्थित होलीक्रॉस संस्थेच्या शाळेत केजी-१ शाखेतील विद्यार्थ्यांसोबत घडला. केक खाल्ल्यामुळे दोन चिमुकल्यांना उलट्या झाल्यात. या घटनेमुळे विद्यार्थी भेदरले होते. गोल्डन बेकरीमधून खरेदी केलेल्या या केकची तक्रार पालकाने अन्न व औषध विभागाकडे नोंदविली. त्यानुसार एफडीए अधिकाऱ्यांनी दुकानातील केकचे नमुने जप्त करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले.
गांधीनगरातील रहिवासी विशाल विजय वाटाणे यांचा मुलगा होलीक्रॉस संस्थेच्या शाळेत ज्युनिअर केजी-१ शाखेत शिक्षण घेत आहे. त्यांच्या मुलाचा शुक्रवारी वाढदिवस होता. आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने शनिवारी शाळेत विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी विशाल वाटाणे यांनी राजकमल चौकाजवळील गोल्डन बेकरीतून एगलेस पॅन फू्रट केक खरेदी केले. मुलाने शाळेतील मित्र-मैत्रिणींना केक वाटले. केक खाल्ल्यावर लगेचच दोन मुलांचा मळमळ व्हायला लागली. त्यांनी उलट्याही केल्या. हा प्रकार पाहून शाळेतील शिक्षकांनी केक वाटण्यास मनाई केली. केकवरील मुदत तपासली. शिक्षकांनी या घटनेची माहिती विशाल वाटाणे यांना दिली. विशाल यांच्यासह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन ते सर्व केक ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी गोल्डन बेकरी गाठून तेथील संचालकास जाब विचारला. सदर केक नागपूरच्या अजित नावाच्या कंपनीकडून खरेदी केल्याचे त्याने सांगितले. विशाल वाटाणे यांनी थेट एफडीए गाठून तक्रार नोंदविली.
एफडीए अधिकाºयांनी गोल्डन बेकरी गाठून संबंधित केकचे नमुने ताब्यात घेतले. ते तपासणीलाही पाठविले. यासंदर्भात शाळेतील फादर जे.ए. रॅमसिन यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणाच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रिया देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

कस्टमर केअर क्रमांक अस्तित्वात नाही
केकच्या पाकिटावर उत्पादनाची तारीख २१ नोव्हेंबर २०१९ आहे. ६० दिवसांच्या आत या उत्पादनाचा वापर करावा, असे नमूद आहे. ३० दिवसांत उत्पादन वापरावे, असाही उल्लेख एका ठिकाणी आहे. मात्र, त्यावर खोडतोड करण्यात आली आहे. उत्पादन तारखेपासून ५७ दिवसांनंतर विक्री केल्याचे निदर्शनास येत आहे. या पाकिटाच्या लेबलवर ०७१२-२२५१५५९ हा कस्टमर केअर क्रमांक दिला आहे. सदर क्रमांकावर संपर्क साधला असता, क्रमांक अस्तित्वात नसल्याचा संदेश ऐकू येतो.

गोल्डन बेकरीतून घेतलेल्या केकमध्ये अळ्या आढळल्याची तक्रार प्राप्त झाली. तेथील केकचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- सुरेश अन्नपुरे
सहआयुक्त (अन्न व औषध विभाग)

आम्ही केक विक्रीचा व्यवसाय करतो. केक नागपूरच्या बेकरीचे असून, त्याची आम्ही विक्री केले. ते कालबाह्य झालेले नव्हते. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केकचे नमुने ताब्यात घेतले आहेत.
- नंदकिशोर मुलानी
संचालक, गोल्डन बेकरी

Web Title: Transfer the larvae to the pan cake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.